सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा वरचष्मा

| मुंबई । वृत्तसंस्था ।

टीम इंडियाने सुपर-12 ग्रुप-2 च्या शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव करत टी-20 विश्‍वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. भारताबरोबरच न्यूझीलंड, इंग्लंड आणि पाकिस्तानचे संघही अंतिम चारमध्ये पोहोचले आहेत.

पहिल्यांदा सिडनीच्या क्रिकेट मैदानावर 9 नोव्हेंबरला पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. तर, 10 नोव्हेंबरला दुसर्‍या उपांत्य फेरीत भारताचा सामना एडलेडमध्ये इंग्लंडशी होणार आहे.इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी कशी राहिली हे या स्टोरीत जाणून घेणार आहोत. तसेच आपण पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यांचा ट्रॅक रेकॉर्ड सुद्धा पाहू.

टी-20 विश्‍वचषकात भारत आणि इंग्लंडमध्ये आतापर्यंत तीन वेळा सामना झाला आहे. त्यात टीम इंडिया 2 वेळा जिंकली. तर इंग्लंडने एक वेळेस सामना जिंकला. 2007 च्या विश्‍वचषकात या दोन्ही संघांमध्ये पहिला सामना झाला होता. या सामन्यात युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार ठोकले. टीम इंडियाने हा सामना 18 धावांनी जिंकला होता. 2009 च्या टी-20 विश्‍वचषकात इंग्लंडने टीम इंडियाचा तीन धावांनी पराभव केला होता. 2012 च्या टी-20 विश्‍वचषकात टीम इंडियाने इंग्लंडवर 90 धावांनी एकतर्फी विजय मिळवला होता. टी-20 विश्‍वचषकाच्या एकाही बाद फेरीत भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकही सामना झाला नाही.

Exit mobile version