टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला रवाना

26 डिसेंबरपासून दौर्‍याला प्रारंभ
। मुंबई । प्रतिनिधी ।

कर्णधार विराट कोहलीच्या स्फोटक पत्रकार परिषदेनंतर गुरुवारी सकाळी भारतीय संघ मुंबईहून विशेष चार्टड विमानाने दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर रवाना झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने विमानात बसलेल्या खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दक्षिण आफ्रिका दौर्‍यात भारतीय संघ तीन कसोटी, तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. कसोटी मालिकेला बॉक्सिंग डे च्या दिवशी 26 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे.
कॅमेर्‍यासमोर पोझ देताना जसप्रीत बुमराहच्या चेहर्‍यावर हास्य होते, तर चेतेश्‍वर पुजारा, शार्दुल ठाकूर आणि मयांक अग्रवाल यांनी चेहर्‍यावर मास्क घातले होते. बोर्डाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव दिसत आहेत.
तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विराट कोहली 18 सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी नव्याने निवड झालेल्या रोहित शर्माची अनुपस्थिती संघाला प्रकर्षाने जाणवेल. दुखातपतीमुळे रोहित शर्मा या कसोटी मालिकेत खेळणार नाहीय. मुंबईत सरावा दरम्यान रोहित शर्माला दुखापत झाली होती. रोहितसह रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल हे दोन प्रमुख डावखुरे गोलंदाजही या मालिकेत खेळणार नाहीयत.
भारतीय टेस्ट टीम- विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), रविचंद्रन अश्‍विन, जयंत यादव, इशांत शर्मा , मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, प्रियांक पांचाल.
स्टँड बाय खेळाडू : नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चाहर, अरजान नागवासवाला

Exit mobile version