टीम इंडियाच आफ्रिका दौरा लांबणीवर

ओमीक्रॉनच्या धास्तीने बीसीसीआयचा निर्णय
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा किमान एका आठवड्याने पुढे ढकलण्यात आला आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सध्या भारतीय क्रिकेट नियमन मंडळ म्हणजेच बीसीसीआय क्रिकेट साऊथ आफ्रिकेच्या अधिकार्‍यांशी यासंदर्भात चर्चा करत आहेत. कोरोनाच्या नव्या ओमीक्रॉन या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने भारताच्या दक्षिण आफ्रिका दौर्‍याच्या वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
भारत अ संघ सध्या दक्षिण आफ्रिकेमध्येच आहेत. मात्र या दौर्‍याच्या नियोजित वेळापत्रकानुसार सामने खेळवले जात असले तरी भारताच्या मुख्य संघाच्या नियोजित दौर्‍यामध्ये ओमाक्रॉनच्या प्रादुर्भावाच्या दृष्टीने बदल करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. भारतीय संघ नियोजित वेळापत्रकानुसार 9 डिसेंबर रोजी चार्टड विमानाने दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार होता. मात्र सध्या या नियोजित वेळपत्रकातील कार्यक्रम आणि डिपार्चर स्थगित करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलीय.
या दौर्‍याच्या वेळापत्रकामध्ये बदल झाल्यामुळे संघामध्येही बदल होणार आहेत. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सध्या सुरु असणार्‍या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या कालावधीमध्ये निवड समितीची दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यासाठी संघ निवड करण्यासाठी बैठक होणार होता. मात्र सध्या बीसीसीआय दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाच्या संपर्कात असून तेथील करोना संसर्गाच्या परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. हे चित्र पूर्ण स्पष्ट झाल्यानंतरच निवड समितीची बैठक घेतली जाणार आहे.

Exit mobile version