टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकांच्या शोध सुरू

। मुंबई । वृत्तसंस्था ।
यूएई व ओमान येथे 17 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे, पण त्याआधीच हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या नव्या प्रशिक्षकपदाचा शोध सुरू झाला आहे.
रवी शास्त्राी व सपोर्ट स्टाफ टी-20 वर्ल्ड कपनंतर आपापल्या पदावर कायम राहणार नाहीत. त्यामुळे या स्पर्धेनंतर हिंदुस्थानला नवीन प्रशिक्षक स्टाफ मिळणार हे निश्‍चित आहे. अनिल कुंबळे व व्हीव्हीएस लक्ष्मण हे हिंदुस्थानचे माजी खेळाडू मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत असून गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी पारस म्हांब्रेच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. रवी शास्त्री यांच्यासोबत गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण व क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांचाही करार नोव्हेंबर महिन्यात संपुष्टात येत आहे. बीसीसीआयकडून नव्या प्रशिक्षकासह सपोर्ट स्टाफचाशी शोध सुरू आहे. त्यामुळे या आठवड्यातच बीसीसीआयकडून सपोर्ट स्टाफच्या पदासाठी जाहिरात काढण्यात येणार आहे.


हिंदुस्थानचा संघ 17 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहे. त्यानंतर 17 नोव्हेंबरपासून हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यामध्ये मायदेशात मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. या मालिकेत नवे प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफ दिसणार आहेत. हिंदुस्थानचा संघ डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महत्त्वपूर्ण दौर्‍यावर जाणार आहे. त्याआधीच ड्रेसिंग रूममध्ये प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ यांचा खेळाडूंसह योग्य समन्वय साधला जावा यासाठी बीसीसीआयकडून लवकरात लवकर ही निवड प्रकिया पूर्ण करण्यात येणार आहे.

Exit mobile version