टीम इंडियाचा ऑल राऊंडर होणार निवृत्त

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नीने सोमवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 37 वर्षीय बिन्नी बराच काळ भारतीय संघाबाहेर होता. 2016 पासून तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तो देशांतर्गत क्रिकेटद्वारे संघात परतण्याचा प्रयत्न करत होता. 2014 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार्‍या स्टुअर्ट बिन्नीने भारतासाठी सहा कसोटी, 14 एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळले आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नींचा तो मुलगा आहे.

वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम त्याच्या नावावर आहे. 2014मध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध चार धावा देऊन सहा विकेट्स घेतल्या. कोणताही भारतीय गोलंदाज आजपर्यंत त्याचा विक्रम मोडू शकलेला नाही.बिन्नीच्या कसोटी क्रिकेटमध्ये 194 धावा आणि 3 विकेट, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 230 धावा आणि 20 विकेट्स, टी-20 क्रिकेटमध्ये 35 धावा आणि एक विकेट आहे. बिन्नीने 95 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 4796 धावा केल्या आणि 148 विकेट्स घेतल्या. 100 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने 1788 धावा काढण्याबरोबरच 99 विकेट्सही घेतल्या.

यावर्षी मार्च महिन्यात बिन्नी शेवटचा मैदानावर उतरला. त्याचा 100वा प्रथम श्रेणी सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. आपल्या शेवटच्या सामन्यात बिन्नीने नागालँडसाठी अरुणाचल प्रदेशविरुद्ध नाबाद 55 धावांची खेळी केली.स्टुअर्ट बिन्नी, त्याच्या वडिलांप्रमाणे मधल्या फळीतील फलंदाज आणि मध्यम वेगवान स्विंग गोलंदाज होता. सुरुवातीच्या टप्प्यात बिन्नी कर्नाटकच्या संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत होता. यानंतर, 2007 मध्ये त्याने इंडियन क्रिकेट लीगसाठी करार केला. तो हैदराबाद हिरोज आणि इंडिया इलेव्हनकडून खेळला.

Exit mobile version