खो-खोच्या दोन्ही गटांत वर्चस्व
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था |
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही (पुरुष व महिला) संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत शुक्रवारचा दिवस गाजवला आहे. महाराष्ट्राच्या पुरुषांच्या संघाने मणिपूरवर, तर महिला संघाने मध्य भारत संघाचा पराभव करत शानदार कामगिरी केली.
पहारगंज रेल्वे कॉलनी येथील करमाळी सिंग क्रीडांगणात ही स्पर्धा सुरू आहे. सकाळच्या सत्रात रंगलेल्या पुरुष विभागातील सामन्यात महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारले. प्रथम संरक्षण करताना महाराष्ट्राकडून ऋषिकेश मुर्चावडे (1.50 मि. संरक्षण), प्रतीक वाईकर (2 मि. संरक्षण व 1 गुण), ऋषभ वाघ (2.40 मि. संरक्षण व 1 गुण), सौरभ घाडगे (3 गुण) यांनी छान खेळ केला. आक्रमणात महाराष्ट्राने 15 गुण मिळवले. मध्यंतरापर्यंत महाराष्ट्राकडे 20 (30-10) गुणांची आघाडी होती. दुसर्या डावात निखिल सोडिये (2 मि. संरक्षण), अक्षय भांगरे (1.40 मि. संरक्षण), विजय शिंदे (1.30 मि. संरक्षण), अक्षय मासाळ (1.40 मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ करत महाराष्ट्राला एक डाव 10 (30-20) गुणांनी विजय मिळवून दिला. मणिपूरतर्फे धनंजय (1 मि. संरक्षण व 2 गुण) यांनी धमक दाखवली. साखळी सामन्यांमध्ये ‘ब’ गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या संघाने अव्वल कामगिरी केली आहे.
महिला विभागात एकतर्फी विजय महिला विभागातील 'अ' गटातील दुसर्या सामन्यात महाराष्ट्राने मध्य भारतवर एक डाव 30 (40-10) गुणांनी एकतर्फी विजय मिळवला. महाराष्ट्राच्या संघाकडे मध्यांतराला 40-4 अशी आघाडी होती. महाराष्ट्राकडून अश्विनी शिंदे (4 मि. संरक्षण), प्रियांका इंगळे (2.20 मि. संरक्षण व 8 गुण), काजल भोर (3.40 मि. संरक्षण व 8 गुण), गौरी (2.40 मि. संरक्षण व 4 गुण) यांनी दमदार खेळ केला. मध्य भारतकडून सेजल (1 मि. संरक्षण) व रोहिणी (4 गुण) यांनी प्रभावी कामगिरी केली.