हळदी-कुंकवाचा विधवा महिलांनाही दिला मान
कॉलनी फोरम व मधु पाटील यांचा स्तुत्य उपक्रम
। पनवेल । प्रतिनिधी ।
हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात सुवासिनींनाच मान देण्याची प्रथा आहे़ परंतु, खारघर येथील कॉलनी फोरमचे सन्मवयक मधु पाटील संकल्पनेतून विधवा नव्हे स्त्री मी हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. हळदी- कुंकू कार्यक्रमास विधवा महिलांनाही मान देत नवा पायंडा घालण्याबरोबर सामाजिक परिवर्तनाचा नवा अध्याय सुरु केला.
यावेळी कॉलनी फोरमचे अध्यक्षा लीना गरड, समन्वयक अनिता भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पतीच्या निधनानंतर महिलेला कुंकू लावण्यास बंदी घालणे कितपत योग्य आहे. दुखा:चा डोंगर डोक्यावर कोसळलेल्या असतानाही शेती, उद्योगधंदे, घरं चालवणे, मुलांचे शिक्षण या सर्व जबाबदार्या महिला आपले कर्तव्य समजून पार पाडतात. तरीही अशा महिलांना समाजात सापत्न वागणूक का? म्हणूनच आम्ही विधवा नव्हे स्त्री मी हा उपक्रम राबवला असल्याचे कॉलनी फोरमचे समनव्यक आणि क्रेडाई एमसीएचआयचे रायगड जिल्हा अध्यक्ष मधु पाटील यांनी सांगितले.
कपाळी कुंकू लागताच डोळ्यात तरळले पाणी
कुंकवाचा धनी परलोकवासी झाल्यानंतर घरीदारी उपेक्षेची नजर वाट्याला आलेल्या महिलांच्या कपाळी हळदी-कुंकवाची बोटं लागली आणि त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. एकमेकींना आलिंगन देऊन निःशब्द भावना नजरेतून व्यक्त झाल्या. विधवा महिलांसाठीच्या हळदी-कुंकू समारंभाचे भावनिक दृश्य यावेळी पाहायला मिळाला. वैधव्य आलेल्या 15 महिलांना यावेळी हळदी कुंकू लावत त्यांना विशेष भेट देत पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.







