तहसील कार्यालयाची इमारत धोकादायक

। म्हसळा । वार्ताहर ।

म्हसळा येथील मुख्य प्रशासकीय इमारत म्हणजे तहसील कार्यालय (महसुलचे सर्व विभाग), पोलीस स्टेशन, परिक्षेत्र वन अधिकारी या तीनही कार्यालयाची इमारती धोकादायक आहे. जंजीरा संस्थान कालीन या इमारतीला सुमारे 100 वर्षांची जुनी परंपरा आहे.

जिल्हाधिकारी रायगड यांच्या सूचनेवरून सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिधोकादायक व धोक्याची संभावना असलेल्या ठिकाणांची पाहणी केली. यात म्हसळा तालुका तहसील कार्यालयाची मुख्य इमारत वापरण्यास धोकदायक आसल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने 17 मे रोजी तहसीलदार यांना दिले आहे. तर, तहसीलदार म्हसळे यांनी तशाच पद्धतीची नोटीस तब्बल दहा दिवसांनी पोलीस स्टेशन आणि वनविभागाला दिली आहे.

तहसील कार्यालय नव्या जागेत उभे रहावे यासाठी तालुक्यातील 38 गुंठेजागा दिली असून दोन वर्ष होऊनही तहसीलदार यांनी शासनाकडे निधीसाठी कुठेही विशेष पाठपुरावा न केल्यामुळे इमारतीचा प्रस्ताव लाल फितींत आडकला आहे. येथील कार्यालयांत रोजचे किमान 80 ते 100 कर्मचारी आणि विविध कामासाठी येणारे जाणारे किमान 400 ते 600 नागरिकांची वर्दळ असते. तसेच, तालुका मुख्यालयांतील महत्वाची कार्यालये म्हसळा नगरपंचायत क्षेत्रापासून दूर अन्यत्र स्थलांतरीत करु नये, अशी नागरिकांची मागणी आहे.

Exit mobile version