लाखो रुपयांची रॉयल्टी महसूलच्या तिजोरीत
। अलिबाग । प्रतिनिधी ।
उरणमधील बोरीपाखाडीमध्ये नारायण भोईर यांच्याकडून खुलेआमपणे माती खोदाईचे काम सुरु आहे. सरकारी जागेतदेखील खोदकाम होत असल्याच्या तक्रारी उरणच्या तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. ही बाब ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली. तरीदेखील तहसीलदारांकडून कारवाई करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
उरण तालुक्यातील बोरीपाखाडी ते केगाव आदी अनेक गावांचा सेफ्टी झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी बोरीपाखाडी या गावात सर्वे नं. 3/1 मध्ये उत्खनन करण्यास नारायण भोईर यांना परवानगी देण्यात आली असून, याच जागेपासून जवळपास 500 मीटर अंतरावर उत्खनन करण्याची मागणी वामन तांडेल यांनी केली आहे. मात्र, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत त्यांची परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. सेफ्टी झोनमध्ये एकाला उत्खनन करण्याची परवानगी, तर दुसर्याला सेफ्टी झोनचा दाखला देत परवानगी नाकारल्याने तहसीलदारांसह प्रांत अधिकार्यांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
सर्कल यांच्या अभिप्रायानुसार तांडेल यांना खोदाई करण्यासाठी मान्यता मिळाली. त्याअगोदर लाखो रुपयांची रॉयल्टी प्रशासनाने घेतली. मात्र, अचानक तहसीलदार उद्धव कदम यांना साक्षात्कार झाला. तांडेल ज्या जागेत खोदाई करणार होते, ती जागा सेफ्टी झोन असल्याचे दाखवून त्यांना खोदाईला विरोध केला. मात्र, त्या परिसरात पाचशे मीटर अंतरावर सेफ्टी झोनमध्ये असलेल्या जागेत भोईर यांच्या खोदाईला मान्यता देण्यात आली. परिणामी, तहसीलदार उद्धव कदम यांच्या दुटप्पी भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. महसूल विभागाने लाखो रुपयांची रॉयल्टी घेतल्यानंतर रातोरात तांडेल यांच्या मंजुरीला स्थगिती देण्यात आली आहे.
नारायण भोईर यांच्याकडून होत असलेली खोदाई बेकायदेशीर व शासकीय जागेत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. ही बाब महसूल प्रशासनाच्या निदर्शनास येत असताना देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महसूल विभागाच्या या दुटप्पी भुमिकेबाबत उरणमध्ये वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. या खोदाईमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरी देखील खोदाईकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजीचे सुरु उमटले आहेत. ही बाब कृषीवलने बातमीच्या रुपात प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, अजूनपर्यंत कोणतीही कारवाई होत असल्याचे दिसून आले नाही. याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. मात्र, तो होऊ शकला नाही.
बोरीपाखाडीमध्ये सर्वे नं. 3/1 मध्ये होत असलेली उत्खननाची परवानगी आमच्याकडून देण्यात आली नाही. मात्र शासकीय जागेत होत असलेल्या उत्खननाबाबत महिती घेऊन पुढील कार्यवाही दोन दिवसात केली जाईल.
उध्दव कदम
तहसीलदार, उरण