टेंभी गावचा पाणीप्रश्‍न निकाली; सुलतान बेणसेकरांच्या पुढाकाराने बसवली टाकी

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा गीता पालरेचा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामांना गती मिळाली आहे. नागरिकांना भेडसावणारे मूलभूत व पायाभूत नागरी सेवा सुविधा देण्यावर विशेष भर दिला जात आहे. पालीनजीक असलेल्या टेंभी वसाहतीला पाणी समस्या भेडसावत होती. त्यामुळे नगरपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती सुलतान बेणसेकर यांनी नगराध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली टेंभी वसाहत येथे दोन हजार लीटर पाण्याची टाकी बसविण्यात आली. त्यामुळे येथील नागरिकांना आता मुबलक पाणीपुरवठा होऊन पाण्यासाठी होत असलेली कसरत आता थांबणार आहे.
पाण्याची टाकी बसवून पाणीप्रश्‍न सोडविल्याने येथील ग्रामस्थांनी सभापती सुलतान बेणसेकर व टीमचे आभार मानले. येथील ग्रामस्थ आता समाधानी व आनंदी झाल्याचे यावेळी पहावयास मिळाले. यावेळी सुलतान बेणसेकर म्हणाले की, टेंभी येथील पाणीप्रश्‍न जसा मार्गी लावण्यात आम्ही यशस्वी झालो, त्याच पद्धतीने झाप आदिवासीवाडी, तलई आदिवासी वाडी, आगरी समाज येथे येत्या दोन दिवसांत पाण्याच्या टाक्या बसविण्यात येणार आहेत. तसेच पालीतील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन 25 ते 30 वर्षांपूर्वी ची जुनी असल्याने तिला बर्‍याच ठिकाणी गळती लागली आहे. पाईपलाईनची गळती काढण्यात आली असून, भविष्याचा वेध घेत पालिकरांना नियमित व मुबलक पाणीपुरवठा व्हावा याकरिता नवीन योजना मंजूर करण्यात आली असून, लवकरच या कामास प्रारंभ होणार आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष आरिफ मणियार, बांधकाम सभापती प्रणाली शेळके, पाणीपुरवठा समिती सदस्य नगरसेवक सुधीर भालेराव, सूरज शेळके आणि कामगार वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version