हवामान विभागाने दिला इशारा
| पुणे | प्रतिनिधी |
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. या थंडीचा मुक्काम 1 फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात तापमान कमी होणार असल्याचे हवामानतज्ञांनी म्हटले आहे.
उत्तर हिंदुस्थानातील डोंगराळ भागांमध्ये सातत्याने बर्फवृष्टी सुरू आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातीलही वातावरणावर झाला आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गारवा पसरला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अशीच स्थिती राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी दहा दिवस कोकणात थंडी जाणवेल तर उर्वरित महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक असेल. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान 10 अंशांच्या खाली राहू शकते, त्याचवेळी उर्वरित महाराष्ट्रात किमान तापमान 12 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.