| दिघी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या हरिहरेश्वर मंदिरातील गाभारे मूर्तींच्या वज्रलेप या धार्मिक विधीसाठी 18 दिवस बंद राहणार आहेत. याच काळात भाविकांना दर्शनासाठी प्रतिमा ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्रीक्षेत्र हरिहरेश्वर मंदिर संस्थानकडून देण्यात आली आहे.
वज्रलेप विधी व मंदिरातील इतर दुरुस्ती कामे 15 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत अशी 18 दिवस करण्यात येणार आहेत. यामध्ये हरिहरेश्वर व कालभैरव योगेश्वरी या मंदिरांचे गाभारे बंद राहणार असून, या कालावधीत भाविकांना प्रत्यक्ष देवांच्या मूर्तींच्या दर्शनाऐवजी केवळ देवांच्या प्रतिमेचे दर्शन घेता येणार आहे.
मंदिरातील गाभारे बंद ठेवण्यात येणार असल्याने अभिषेक पूजा तसेच कौलप्रसाद, चंदन पूजा बंद असणार आहे. मात्र, घाटावरील विधीवत कामकाज म्हणजे येथे होणारे मरणोत्तर दिवसकार्य, अस्थीविसर्जन, पिंडदान त्या संबंधित इतर कामे चालू राहतील, अशी माहिती हरिहरेश्वर न्यासाने दिली आहे.