जितेमधील मंदिरात चोरी करणारा अटकेत

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

जिते गावातील जितू आई मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्याला दादर सागरी पोलिसांनी 72 तासांच्या आत जेरबंद केले आहे. हा चोर जिते गावातीलच असून सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांच्या जाळ्यात फसला आहे.

जितू आई मंदिरात अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करुन मंदिरातील 5 हजार रुपये किमतीचे दागीने चोरी करून नेले होते. याप्रकरणी फिर्यादी हरिश्चंद्र रामदास म्हात्रे (वय 67 रा.शांतीनगर, जिते, ता.पेण) यांनी दादर सागरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल होताच दादर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोळे यांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवून परिसरात तपास सुरू केला. अजित गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रसाद पाटील, सहाय्यक फौजदार श्याम पाटील, अंमलदार अतिश पाटील, पोलीस हवालदार सूरज पाटील, पोलीस हवालदार रवि मुंडे यांचे पथक तपासासाठी रवानाही झाले.

यावेळी दादर सागरी पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत तपास करून व गावातील इतर नागरिकांकडून अधिक माहिती घेत याच जिते गावातील जग्गी उर्फ जगदीश रामचंद्र पाटील वय 24 रा.जिते यास ताब्यात घेतले. आरोपीला पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने चोरीचा गुन्हा कबूल केला. आरोपीस दादर सागरी पोलिसांनी अटक केली आहे.

Exit mobile version