जिल्ह्यातील मंदिरांचे द्वार उघडले

शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होत असताच राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्यभरातील मंदिरांची बंद असलेली द्वारे दर्शनासाठी आजपासून खुली झाली आहेत. मात्र आजपासूनच अटी आणि शर्तींवर उघडण्यात आलेल्या मंदिरांमध्ये भाविकांची उपस्थिती तुरळक होती. रायगड जिल्ह्यात अष्टविनायकामधील पाली येथील बल्लाळेश्‍वर आणि महड येथील वरदविनायक यांच्यासह रोह्यातील धाविर महाराज, अलिबाग येथील काळंबा देवी, चौलची शितला देवी, महाड येथील विरेश्‍वर, मुरुड-नांदगाव येथील सिद्धीविनायक, श्रीवर्धन हरिहरेश्‍वर, दिवेआगर येथील सुवर्ण गणेश यांच्यासह अनेक मंदिरे भाविकांचे श्रद्धास्थान आहेत.
दरवर्षी मोठ्या जल्लोषात 9 दिवस साजरा केला जाणारा नवरात्रीचा उत्सव यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साधेपणाने साजरा केला जात आहे. घटस्थापनेदिवशी महाराष्ट्रातील सर्व देवींच्या मंदिरात अलोट गर्दी असते. जिल्ह्यात 1 हजार 274 सार्वजनिक मंडळांनी देवीची प्रतिष्ठापना केली आहे. तर 1 हजार 682 खाजगी घटांची स्थापना करण्यात आली आहे. कोरोनानंतर दीड वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आजपासून मंदीरे उघडण्यात आली आहेत. ग्रामीण भागात शारदीय नवरात्रौत्सव गावातील मंदिरात साजरा केला जातो. कोरोनामुळे मागील वर्षी हा उत्सव साजरा करता आला नव्हता; मात्र आज मंदीरात नवरात्रौत्सावानिमित्ताने तुरळक गर्दी दिसून आली. याचबरोबर पहिल्या दिवशी घटस्थापना करून पुढे आठ दिवस घरोघरी देव्हार्‍यात अखंड नंदादीप तेवत राहणार आहेत. देवीला दररोज पिवळ्या फुलांची माळा चढवल्या जाणार असल्याने बाजारपेठांमध्ये पुलांची आवक वाढली आहे.
शासनाने नवी नियमावली सुरु करुन मंदिरे सुरु केली आहेत. अष्टविनायकापैकी महडचा वरदविनायक, पालीचा बल्लाळेश्‍वर या सारख्या मंदिरांसह हजारो मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली राहणार आहेत. भाविकांनी आज नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले.

गरबा खेळण्यास निर्बंध
करोनाचे संकट अजून पूर्णपणे शमलेले नाही. त्यामुळे गरबा आणि दांडियाने यंदाही नवरात्रौत्सव साजरा करता येत नसला तरी आपल्या जवळच्या मित्र मंडळी, नातेवाईकांना नवरात्रीच्या शुभेच्छा देणारे वेगवेगळे मेसेज, स्टेसस आणि कोट्स शेअर करून या उत्सवाचा आनंद द्वीगुणीत करण्याचा प्रयत्न तरुणाई करत आसल्याचे दिसून येत आहे.

मंडपांचा आकार झाला लहान
नव्या नियमावलीनुसार नवरात्रौस्तव साजरा करताना साधेपणात साजरा करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे दांडीयासाठी लागणारी साऊंड सिस्टीम, रोषणाई आणि इतर कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर मंडपात एकावेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे सार्वजनिक नवरात्रौस्तव मंडळांनी आपला खर्च कमी करत मंडपाचा आकारही लहान केला आहे.

मंदिराचे द्वार खुले झाल्यामुळे समाधान वाटते. गेल्या वर्षी देखील प्रतिबंध असल्यामुळे भाविकांना दर्शन घेता आले नव्हते. यावर्षी दर्शन घेता येणार आहे. आम्ही सर्व सुरक्षा नियमांचे पालन करुन भाविकांची गर्दी होणार नाही यासाठी नियोजन केलेले आहे.
जिवन अनंत गुरव
काळंबादेवी मंदिराचे गुरव

Exit mobile version