पाच कामगारांसह दोन लहान मुले जखमी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाजने येथून अलिबागकडे जाणार्या टेम्पोचा घोटवडेजवळ अपघात झाला. या अपघातामध्ये सातजण जखमी झाले आहेत. त्यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटून मंगळवारी सकाळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युत खांबाला जोरदार धडक लागली. त्यामध्ये गाडीचे नुकसान झाले असून, जखमींना अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपाचारासाठी दाखल केले आहे.
सध्या भात कापणीसह झोडणीचा हंगाम सुरु आहे. वेगवेगळ्या भागातील आदिवासीवाड्यातील मंडळींना रोजगाराचे साधन खुले झाले आहे. महाजने येथील दिवीवाडी येथील कामगारांना टेम्पोत घेऊन चालक विजय शिपाई वावे येथून भेरसेकडे जात होता. घोटवडेजवळ आल्यावर सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या महावितरण कंपनीच्या विद्यूत खांबाला टेम्पोची जोरदार धडक लागली. या धडकेत चालकासह टेम्पोतील कामगारांनादेखील दुखापत झाली. जखमींना तात्काळ अलिबागमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती रेवदंडा पोलिसांनी दिली. वडापाव खात तो वाहन चालवित असताना ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.
सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
महाजने दिवीवाडीवरून भेरसे येथे निघालेला टेम्पो रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्यूत खांबाला धडकला. उच्च दाब वाहिनीच्या विद्युत खांबाला धडकल्यानंतर खांब वाकला. विद्युत सेवा अचानक खंडित झाली. त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असल्याचे महावितरण कंपनीच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
महिन्याभरापूर्वी घेतला होता टेम्पो
शिक्षण असूनदेखील नोकरी नसल्याने वेगवेगळ्या गावांतील तरुण स्वतःचा लहान-मोठा व्यवसाय सुरु करीत आहेत. त्यामध्ये काही तरुण टेम्पो, मिनीडोअर चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत. भेरसे येथील तरुण विजय शिपाई याने एक महिन्यापूर्वी टेम्पो विकत घेतला होता. यातून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असत. परंतु, मंगळवारी झालेल्या या अपघातामुळे चालकाच्या टेम्पोचे नुकसान होऊन वित्तहानीदेखील झाली आहे.