खचलेल्या रस्त्यात टेम्पो अडकला

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या विठ्ठलवाडी परिसरातील गारभट येथे मुसळधार पावसाने मुख्य रस्ता खचला. त्यामुळे रस्त्याची मोठी हानी झाली असून, येथून मार्गस्थ होणारा एक टेम्पो रस्त्यात अडकला.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पुगाव नम्रता ढाबा ते गारभट विठ्ठलवाडी या अंतर्गत असलेल्या रस्तावरून दिवसातून अनेक वेळा वाहनांची रहदारी सुरू असते. हा रस्ता गारभट येथून पुढे पाली नांदगाव येथे मिळाला आहे. हा संपुर्ण परिसर निसर्गरम्य परिसरात वसला असल्याने या परिसरात ठिकठिकाणी फार्म हाऊस व रिसॉर्ट बांधण्यात आले आहेत. तसेच पावसाळ्यात येथील डोंगर दऱ्यात फेसाळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करीत असतात. परिसर दुर्गम असला तरी दिवसेंदिवस येथील रहदारी मात्र वाढत चालली आहे. दरवर्षी पावसाळ्यात येथील रस्तावर रस्ता खचणे, दरड कोसळणे, झाडे कोसळणे अशा घटना घडत असतात. तर शनिवारी दुपारपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गारभट हद्दीतील उतारावरील रस्ता खचल्याची घटना घडली. याच दरम्यान येथून मार्गस्थ होणारा मालवाहू टेम्पो त्यात अडकला. सुदैवाने या घटनेत टेम्पो चालक व टेम्पोची फार मोठी हानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.

Exit mobile version