| पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात इसुजू पिकअप टेम्पो व टोईंग व्हॅन यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. भरदुपारी दोन वाजता पार्टेवाडी गावाच्या हद्दीत हा अपघात झाला.
डी मॅक्स गाडी (क्रमांक एमएच 04 केएफ 4804) वरील चालक अनिस हसन मिया जसनाईक (वय 27, रा. खेड जसनाईक मोहल्ला) हा त्याच्या ताब्यातील इसुजु पिकअप टेम्पो महाड ते खेड असा चालवित घेऊन जात असताना समोरून रत्नागिरी ते महाड येणारी टोईंग व्हॅन (क्रमांक एमएच 12 एचएफ 4251) ला समोरून ठोकर दिल्याने अपघात झाला. यावेळी इसूजू टेम्पो टोईंग व्हॅनच्या धडकेने रस्त्याच्या कडेला पलटी झाला.
या अपघातात टोईंग व्हॅनवरील चालक रोशन अरविंद पांचाळ (वय 25 रा. सिध्दार्थ नगर जि. अमरावती) याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, इसूजु पिकअप टेम्पोच्या चालकासोबतचे प्रवासी हजरत हसनमिया जसनाईक (वय 29 रा.खेड) यांच्या डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली.
अपघाताचे वृत्त समजताच कशेडी महामार्ग मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण धडे, सहाय्यक फौजदार महेश जाधव, पो.ना. शंकर कुंभार, हे.कॉ. रामागडे आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. जखमींपैकी रोशन पांचाळ यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी महाड येथे हलविण्यात आले. यानंतर महामार्गावरील वाहतूक कशेडी पोलिसांनी सुरू केली.