20 कामगार गंभीर जखमी तर एकाला किरकोळ दुखापत
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
गेल कंपनीतील कामगारांची वाहतूक करणारा टेम्पो शुक्रवारी (दि. 13) पलटी झाला. या अपघातामध्ये 22 कामगारांपैकी एकाचा मृत्यू झाला असून, 20 जण गंभीर जखमी झाले असून एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. रामराज येथे नमाज पठणासाठी जात असताना हा अपघात बोरघर फाट्यावर वळणावर झाला असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. साधारणपणे जखमीसह मृत कामगारांचे वय 20 ते 45 पर्यंत असल्याची माहितीसमोर येत आहे. त्यात 20ते 35 वयोगटातील तरुण कामगारांची संख्या 18 आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,अलिबाग तालुक्यातील गेल कंपनीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाचे काम सुरु आहे. या प्रकल्पाच्या कामांसाठी वेगवेगळ्या राज्यातून कामगार उसर येथील गेल कंपनीत गेल्या अनेक महिन्यांपासून आहेत. या मुस्लीम कामगारांना नमाज पठणासाठी रामराज येथे जायचे होते. त्या कामगारांना घेऊन चालक त्याच्या टेम्पोमधून उसर येथून रामराजकडे घेऊन जात होता. दुपारच्यावेळी बोरघर फाट्याजवळ आल्यावर वळणावर चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे टेम्पो अचानक पलटी झाला. यामध्ये सर्व कामगार जखमी झाले. जखमींना अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये खुशमुहम्मद अल्लाउद्दीन (33) या कामगाराचा मृत्यू झाला. कौसर मल्लिक(24) या कामगाराची प्रकृती चिंताजनक असल्याने अति दक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. राहतअली कासीमअली (20) या कामगाराला किरकोळ दुखापत झाल्याने त्याच्या उपचार करून त्याला सोडण्यात आले आहे. तसेच मोहम्मद रफिक, सोहेब अली, बिट्टूशेट शेख, असीम खान, रोजमहम्मद अली, शाहिद हुसे, तारिफ हूसे, नाहीद हुसेन, मोहम्मद खान, फारूक मलिक, तस्लीम हुसैन, अरमान हुसैन, इब्राहिम अली, एजाज अन्सारी, नुसरत आली, महम्द वकील, अफरोज अन्सारी, महमदशान अहमद, महमद अराफक या 19 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयातील सर्जिकल वार्डमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.







