कोकणवासियांना दिलासा; दहा अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या धावणार

मध्य रेल्वेचा निर्णय

। धाटाव । प्रतिनिधी ।

उन्हाळी सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणावर कोकणवासीय आपल्या गावी जात असून, रेल्वे, एसटी आणि खासगी बस सेवांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोकण मार्गावर दहा अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आठ गाड्या सावंतवाडी रोडसाठी तर 2 गाड्या मडगावसाठी धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पनवेल-सावंतवाडी रोडदरम्यान साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक 01007 ही 16 मे ते 6 जून 2026 या कालावधीत प्रत्येक शनिवारी पनवेलहून सायंकाळी 6.10 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 4.30 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक 01008 ही त्याच कालावधीत प्रत्येक शनिवारी सावंतवाडी रोडहून सकाळी 7.20 वाजता सुटून सायंकाळी 5 वाजता पनवेल येथे पोहोचणार आहे. या गाड्यांना पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबे देण्यात आले आहेत. तसेच पनवेलमडगाव विशेष गाडी क्रमांक 01105 ही सोमवार, 18 मे 2026 रोजी पनवेलहून सकाळी 5.45 वाजता सुटून त्याच दिवशी सायंकाळी 6.10 वाजता मडगाव येथे पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक 01106 ही रविवार, 17 मे 2026 रोजी मडगावहून दुपारी 4.30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता पनवेल येथे पोहोचेल. या गाड्यांना पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी येथे थांबे देण्यात आले आहेत.

गाडी क्रमांक 01007 साठी विशेष शुल्कासह आरक्षण सुरू झाले असून, गाडी क्रमांक 01105 साठीचे बुकिंग 16 मेपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि irctc.co.in वर उपलब्ध करण्यात आले आहे. अनारक्षित डब्यांसाठी यूटीएस प्रणालीद्वारे सामान्य शुल्कात तिकीट उपलब्ध होणार आहे. प्रवाशांनी indianrail.gov.in तसेच enquiry.indianrail.gov.in⁠ ॲपचा वापर करून गाड्यांचे वेळापत्रक आणि इतर माहिती तपासावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Exit mobile version