। पनवेल । वार्ताहर ।
खारघरमधील कोपरा गावात तसेच एपीएमसीतील कोपरी गावात बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या 10 बांग्लादेशी नागरिकांची अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापेमारी करुन अटक केली आहे. यात 2 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश असून सर्व बांग्लादेशी नागरिक मागील काही वर्षभरापूर्वी बांग्लादेशातून भारतात आल्याचे आणि तेव्हापासून ते या भागात वास्तव्यास असल्याचे चौकशीत आढळून आले आहे. सर्व बांग्लादेशी नागरिक मजुरी आणि घरकाम करुन राहत असल्याचे त्यांच्या चौकशीत आढळून आले आहे.
खारघर, सेक्टर-10 मधील कोपरा गांव भागामध्ये काही बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फृथ्वीराज घोरपडे आणि त्यांच्या पथकाने पहाटेच्या सुमारास खारघर, सेक्टर-10 कोपरा गांव येथे छापा टाकला. त्या ठिकाणी बांग्लादेशी 1 पुरुष आणि 3 महिला बेकायदेशीररीत्या राहत असल्याचे आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीत त्यांनी 2023 मध्ये घुसखोरीच्या मार्गाने कोणत्याही वैध प्रवासी कागपत्रांशिवाय भारतात प्रवेश केल्याचे आढळून आले. त्यांनतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पहाटे वाशी, सेक्टर-26 कोपरी गांव येथे छापा मारला. यावेळी त्या ठिकाणी बांग्लादेशी 1 पुरुष आणि 5 महिला बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्याचे तसेच त्यापैकी एका महिलेकडे एक लहान मुल असल्याचे आढळून आले. दरम्यान, सदर दोन्ही कारवाईत अटक ताब्यात घेण्यात आलेले बांग्लादेशी पुरुष बिगारी काम तर महिला या घरकाम करीत असल्याचे त्यांच्या चौकशीत आढळून आले आहे. या सर्वांविरोधात खारघर पोलीस ठाणे आणि एपीएमसी पोलीस ठाणे येथे पारपत्र (भारतात प्रवेश) तसेच विदेशी व्यक्ती अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान खारघर, सेक्टर- 18 मध्ये मोनिल कबीर खान (44) नामक बांग्लादेशी नागरिक पोलिसांच्या हाती लागला असून त्याच्याकडे पासपोर्ट असून त्याचा व्हिसा एक वर्षापूर्वी संपल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवुन विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्या आदेशाने डिपोर्ट करण्याची कार्यवाही सुरु केली आहे.
बांग्लादेशी नागरिकांना भाड्याने घर दिल्यास, अथवा त्यांना कामासाठी ठेवल्यास संबधित घरमालक, बांधकाम व्यावसायिक किंवा परदेशी नागरिकांना मदत करणार्या इतर व्यक्तींविरुध्द कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांना सहआरोपी करण्यात येईल, असा इशारा नवी मुंबई पोलीसांकडून देण्यात आला आहे.