| भंडारा | वृत्तसंस्था |
भंडारा शहरात काल दि. 22 एप्रिलच्या मध्यरात्रीच्या सुमारास चक्क 10 दुकानात चोरीची घटना उजेडात आली आहे. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या रिमझिम पाऊस आणि विजांचा कडकडाटाचा फायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील दुकाने फोडल्याची घटना घडली आहे. यात सर्व दुकानांची शटर्स तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करीत दुकानातील गल्ल्यातील रोख रक्कम आणि मुद्देमाल लुटला आहे. हा प्रकार सकाळी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची माहिती भंडारा पोलिसांना दिली. गेल्या काही वर्षातली ही भंडारा शहरातली सर्वात मोठी चोरी असल्याचेही बोलले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तात्काळ तपास सुरू केला असता, पोलिसांनी आतापर्यंत दोन संशयित चोरट्यांना अटक केली आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत. मात्र, या घटनेनं व्यापारी वर्गांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
भंडारा शहरातील सात आणि जवाहरनगर पोलिस स्टेशन हद्दीतील तीन असे दहा दुकानं चोरट्यांनी काल मध्यरात्री फोडली. ही घटना पहाटे उघडकीस आली. चोरट्यांनी फोडलेल्या दुकानात किराणा, मेडिकल स्टोअर्स, ज्वेलरी शॉप, स्वीट मार्ट, वाईन शॉप, पतंजली स्टोअर आदींचा समावेश आहे. नऊ आरोपी तीन दुचाकिंवरून आल्याच सीसीटीव्हीत कैद झाल आहे. भंडारा पोलिसांची रात्री ग्रस्त नसल्यानं ही घटना घडल्याचा संताप व्यापारी वर्गात व्यक्त होत आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज बघून भंडारा पोलिसांच्या पथकानं नागपुरातून दोघांना ताब्यात घेतलं असून त्यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. या चोरींमध्ये कितीचा मुद्देमाल किंवा रोख चोरट्यांनी लंपास केले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सध्या याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून पकडण्यात आलेल्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, डॉग स्कॉडसह घटनास्थळी पोहोचले. उर्वरित आरोपींनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असा विश्वास भंडारा पोलिसांनी व्यक्त केलाय.