नवीन पनवेल उड्डाण पुलावरील काँक्रिटीकरणाची महिनाभरात निविदा

। पनवेल । प्रतिनिधी ।

नवीन पनवेल माथेरान महामार्गाला जोडणार्‍या उड्डाण पुलाची दूरवस्था झाल्याने दोन्ही मार्गिकेवर पूर्णतः काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केली होती. त्यानुसार प्रस्ताव मंजूर झाला असून येत्या महिनाभरात निविदा काढण्यात येईल आणि तात्काळ कामाला सुरुवात करण्यात येईल अशी ग्वाही सिडकोचे मुख्य अभियंता डॉ. के. एम. गोडबोले यांनी दिली.

पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी सोमवारी (दि.12) गोडबोले यांची सिडको भवन बेलापूर, सीबीडी येथे भेट घेतली. त्यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेतून गोडबोले यांनी रेल्वे विभागाचे सिडकोचे विभागीय अभियंता बेल्ले यांच्याकडून माहिती घेतली. त्या अनुषंगाने कडू यांना महिनाभरात निविदा काढण्यात येईल, अशी माहिती दिली.

नवीन पनवेल शहराला जोडणार्‍या मार्गांवर पनवेल तालुक्यातील नेरे आणि माथेरानकडे जाणारी शेकडो गावे, वाड्या, पाडे जोडली असून दळणवळणाचा हा प्रमुख मार्ग आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून उड्डाणपूल खड्ड्यांमुळे जर्जर झाला आहे. पावसाळ्यात त्याचे तीव्रतेने धक्के जाणवत आहेत. गेली दोन वर्षे कांतीलाल कडू सिडकोला धारेवर धरत खड्डे पेव्हर ब्लॉकने बुजून घेत आहेत. मात्र हा उपाय सुद्धा डोकेदुखी ठरत असल्याने नागरिक त्रागा करीत आहेत.

Exit mobile version