| कोलकाता | वृत्तसंस्था |
सय्यद मुश्ताक अली चषक टी-20 स्पर्धेतील कोलकाता येथे सुरू असलेल्या गोवा विरुद्ध बिहार या लढतीत वैभव सुर्यवंशी व अर्जुन तेंडुलकर हे दोघे आमनेसामने आले होते. त्यामुळे यामध्ये कोण बाजी मारेल, याची उत्सुकता सर्वांनाची होती. परंतु, बिहारच्या चौदा वर्षाच्या वैभव समोर अर्जुन तेंडुलकरची गोलंदाजी सपशेल फेल ठरली.
बिहारच्या वैभव सुर्यवंशीने मागील सामन्यात महाराष्ट्र संघाविरुद्ध नाबाद 108 धावांची खेळी करून विश्वविक्रमाला गवसणी घातली होती. टी-20 क्रिकेटमध्ये 14 वर्षांचा असताना तीन शतके नावावर करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला होता. या साम्यापूर्वी वैभवची कामगिरी काही खास झाली नव्हती. मात्र, या शतकाने त्याचा आत्मविश्वास वाढवला होता आणि त्याने गोवा विरूद्ध देखील तसाच आक्रमक खेळ केला. दुसरीकडे अर्जुन तेंडुलकर गोवा संघासाठी सलामीवीर फलंदाज अन् गोलंदाज अशी दुहेरी भूमिका पार पाडत आहे. त्याने मागील चार सामन्यांत 6 बळी घेतले आहेत आणि फलंदाजीतही योगदान दिले आहे. त्यामुळे वैभवचा आक्रमक खेळ तो कसा रोखतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, यात वैभवने बाजी मारली. अर्जुनने पहिल्या षटकात टिच्चून मारा करताना वैभव व कर्णधार एस गानी यांना फक्त 5 धावा दिल्या. मात्र, त्यानंतर वैभवने अर्जुनच्या दुसऱ्या षटकात 11 धावा चोपल्या. या फटकेबाजीनंतर अर्जुनची 2 षटकानंतर गोलंदाजी थांबवण्याचा निर्णय घेतला गेला. तेच कौशिक व्ही यानेही 2 षटकांत 19 धावा दिल्या. मात्र, दीपराज गावकरने सहाव्या षटकात बिहारला मोठा धक्का दिला. त्याने वैभवला 25 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकारासह 46 धावांवर बाद केले.







