। चिरनेर । वार्ताहर ।
जेएनपीटी बंदरात आयात झालेल्या मोबाइल अॅक्सेसरीजच्या कंटेनरमध्ये तपासणीमध्ये सिगारेट असल्याचा संशय कस्टमला आल्याने तो त्यांनी ताब्यात घेऊन खोपटे येथील अलकार्गो गोडाऊनमध्ये ठेवला होता. बरोबर महिन्याने तो उघडला असता त्यातील माल चोरीला गेल्याचे दिसून आले. कस्टम विभागाने दिलेल्या तक्रारीवरून उरण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ठाणे येथील एच आर इंटरप्राईजेसने मोबाईल क्सेसरीज आयात केली होती. त्यात 4150 किलो वजनाचे मोबाईल फोन अॅक्सेसरीजचे 1143 कार्टून होते. तपासणी कस्टमला सिगारेट असल्याचे आढळल्याने कंटेनर ताब्यात घेऊन खोपटे येथील ऑल कार्गो लॉजिस्टिकमध्ये ठेवण्यात आला होता. मात्र महिन्याभरात कंटेनर उघडला असता मोबाईल अॅक्सेसरीजच्या 1143 कार्टून बॉक्सपैकी फक्त 508 बॉक्स व त्यांचे वजन 1460 किलो इतकेच आढळले.कष्टम विभागाकडून पकडलेले संशयास्पद कंटेनर ज्या वेअर हाऊसमध्ये ठेवण्यात येतात, तिथे सुरक्षारक्षक तैनात असतात. मात्र, त्यानंतरही चोरी होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.