स्वागत रॅलीत राष्ट्रवादीने दाखवले काळे झेंडे
| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा तालुक्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडीत म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह आठ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले यांचा उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. या प्रवेशामुळे खासदार सुनील तटकरे यांना धक्का बसला होता. त्यानंतर दोन दिवसांनी लगेच खा. सुनील तटकरे यांनी राजकीय शह देत शिवसेनेच्या तालुका प्रमुखासह महिला आघाडी, विभाग प्रमुख, शहरप्रमुख यांचा प्रवेश घेऊन शिवसेनेला आव्हान दिले होते.
राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार आणि स्वागत रॅली पेट्रोलपंप ते नगरपंचायत कार्यालयापर्यंत मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. परंतु, रॅली नगरपंचायत कार्यालयासमोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणा दिल्या. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा घोषणाबाजी केली. त्यामुळे काहीकाळ बाजारपेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून म्हसळा पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता.






