| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील राजेवाडी गावामध्ये गो हत्याकरून बेकायदेशीर गोमांस विक्री केली जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना कारवाई करण्याची मागणी केली. यादरम्यान आरोपी आणि गोरक्षक यांच्यामध्ये बाचाबाची आणि मारहाण झाली. त्यानंतर महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये गोरक्षक तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी कारवाई करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. यामुळे तणाव निर्माण होऊन पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
गोरक्षकांनी आरोपींना मारहाण केली. त्यामुळे आरोपींसह अन्य लोकांनी या गोरक्षकांवर हल्ला चढवला. रिहान रशीद आलेकर, रहमान अब्दुल करीम पालेकर, फरहान अब्दुल करीम पालेकर अशी तीन आरोपांची नावे आहेत. हे वृत्त महाड शहर व आजूबाजूच्या परिसरात वाऱ्यासारखे पसरताच महाड शहर पोलीस ठाण्यात गर्दी जमण्यास सुरुवात झाली. पोलिसांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शांततेच्या आवाहन केले मात्र पोलीस जोपर्यंत गुन्हा दाखल करत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका घेतल्याने अखेर महाड शहर पोलिसांनी जमलेल्या जमावावर लाठी हल्ला केला त्यामुळे शांततेत जमलेला जमाव अखेर संतप्त झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेना दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष चेतन पोटफोडे व महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष मोरे यांनी याबाबत कठोर भूमिका घेतल्याने ते आजच्या या गोवंश हत्या प्रकरणात हिंदू रक्षक समितीच्या कार्यकर्त्यांसोबत असल्याने तो राग मनात धरून महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी जाणीवपूर्वक या दोघांना दंगल सदृश्य परिस्थिती घडवण्यास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा त्या दोघांवर दाखल केला आहे.
या प्रकरणांमध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल होणार आहेत. ज्या व्यक्तींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल होत आहे त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांकडून मारहाणीचा तर गोरक्षक देखील मारहाणीची परस्पर विरोधी तक्रार दाखल केली जात आहे. तसेच पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या गर्दीतून पोलिसांवर धावून गेल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत आहे. याप्रकरणी नागरिकांनी शांतता राखली पाहिजे. समाज माध्यमावर येणाऱ्या कोणत्याही संदेशावर विश्वास न ठेवता शांतता राखण्याची आव्हान देखील पोलिसांनी केले आहे. अशा प्रकारच्या संदेशातून जातीय तणाव आणि वाद निर्माण होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी देखील पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.