दोन गट आमनेसामने; औरंगजेबाच्या कबरीचा वाद विकोपाला
। नागपूर । प्रतिनिधी ।
नागपुरात औरंगजेबाच्या कबरीचा वाद विकोपाला पोहोचला आहे. सोमवारी (दि. 18) रात्री महाल परिसरात काही तरुणांनी दगडफेक करत जाळपोळ केली. दोन गटात झालेल्या या वादानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, दगडफेकीमुळे पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या वापरल्या. तसेच, अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी करत सोमवारी दुपारच्या सुमारास विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. संध्याकाळी सातच्या सुमारास दुसरा गट रस्त्यावर उतरला. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. दगडफेकीत काही पोलीसही जखमी झाले. तर काही ठिकाणी वाहने पेटवून देण्यात आली. यात पोलिसांच्या वाहनांचे तसेच इतरही काही वाहनांचे मोठं नुकसान झाले आहे.
या राड्यानंतर मंगळवारी परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले आणि 80 जणांना अटक केली आहे.