शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल उद्या 16 जुलै रोजी दुपारी एक वाजता जाहीर होईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. यावर्षीची दहावीची परीक्षा कोरोना प्रादुर्भावाचा विचार करुन रद्द करण्यात आली होती. मात्र, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन पद्धती जाहीर करण्यात आली होती.
निकाल जाहीर झाल्यावर शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in, mahahsscboard.in वर विद्यार्थ्यांना तो पाहता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी म्हणजे 2021 साली एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस पात्र ठरले. त्यापैकी 9 लाख 9 हजार 931 मुले असून, मुलींची संख्या 7 लाख 48 हजार 693 इतकी आहे. एकूण आठ माध्यमांमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. निकाल कोणत्या संकेतस्थळावर पाहता येईल याबद्दलची माहिती लवकरच जाहीर करू, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र, दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे अंतर्गत गुणांच्या सहाय्याने करण्यात आले आहे. 100 गुणांच्या मूल्यमापनामध्ये 50 गुण हे या विद्यार्थ्यांच्या नववीच्या गुणांच्या सहाय्याने दिले जातील. तर, उरलेले 50 गुण हे दहावीच्या मूल्यमापनावर आधारित असतील. विद्यार्थ्यांना जर मिळालेले गुण समाधानकारक वाटत नसतील, तर कोरोना प्रादुर्भाव संपल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे.