अहिल्यानगर येथे भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

। अहिल्यानगर । प्रतिनिधी ।

अहिल्यानगर येथे एक भीषण अपघात घडला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव – कोळगाव रोडवर असलेल्या माऊली मंदिराजवळ ट्रक आणि इको कार समोरासमोर येऊन भीषण धडक बसली. ही धडक एवढी जोरदार होती की त्यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे तीनच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव – कोळगाव रोडवर असलेल्या माऊली मंदिराजवळ दोन वाहनांची धडक झाली. इकोकार आणि ट्रक एकमेकांवर प्रचंड वेगाने आदळले. या अपघातात कारचालकासह आणखी तिघांचा जागीच मृत्यू झाला. त्यापैकी तिघे जण हे एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. कारचालक नितीन कोकाटे, गजानन पायघन, ध्रुपता पायघन, वैभव पायघन अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. तर याच कारमध्ये करण पायघन हा 13 वर्षांचा मुलगाही होता. अपघाता त्याचा जीव वाचला मात्र त्याला जबर मार लागला आहे. त्याच्यावर नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात होताच ट्रक ड्रायव्हर मात्र घटनास्थळावरून फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच बेलवंडी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवी घटनास्थळी धाव घेतली. बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार ट्रक ड्रायव्हरचा कसून शोध घेण्यात येत आहे.

Exit mobile version