दोघे जागीच ठार
मोटारसायकल जेसीबीला धडकली
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग-पोयनाड रस्त्यावर तिनविरा येथील गेस्टहाऊसजवळील वळणावर मोटारसायकल जेसीबीला धडकून झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. सत्यवान विष्णू राऊत (23, मूळ रा. सिंधुदुर्ग) आणि अंशुमन निराकार मोहंती (23, रा. ओडिशा) अशी मृतांची नावे आहे. हे दोघेही रिलायन्स टाऊनशिपच्या उमंग रेस्टहाऊसमध्ये कामाला होते.
सोमवारी 21 जून रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातग्रस्त मोटारसायकल ही अलिबागवरुन पोयनाडच्या दिशेने चालली होती. तर, जेसीबी पोयनाडवरुन अलिबागच्या दिशेने येत होता. तिनविरा येथील गेस्टहाऊसजवळील वळणावर मोटारसायकलचालकाचे नियंत्रण सुटले आणि मोटारसायकल जेसीबीला जाऊन धडकली. यामध्ये मोटारसायकलवरील सत्यवान राऊत आणि अंशुमन मोहंती या दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोयनाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महादेव जाधव हे इतर पोलीस कर्मचार्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेनासाठी पाठविण्यात आले आहेत. याबाबतचा अधिक तपास सुुरु आहे.