| नाशिक | प्रतिनिधी |
समृद्धी महामार्गावर इगतपुरी बोगद्याच्या पुढे शहापूर हद्दीत आलिशान मर्सिडीज कारचा भीषण अपघात झाल्याची घटना बुधवारी (दि.25) घडली आहे. यात नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा अपघातात मृत्यू झाला असून, त्यांच्या पत्नी व दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सुनील हेकरे आणि त्यांचे कुटुंबीय मुंबईहून नाशिककडे आलिशान मर्सिडीज गाडीतून प्रवास करत होते. मात्र, समृद्धी महामार्गावर इगतपुरी बोगद्याच्या पुढे शहापूर हद्दीत त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, गाडीने तीन वेळा पलटी मारली आणि सुनील हेकरे हे गाडीतून बाहेर फेकले गेले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि प्रचंड रक्तस्रावामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे हेकरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावरील इगतपुरी-आमणे या 76 किमी लांबीच्या 4 थ्या आणि शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत समृद्धी महामार्गावर अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. या महामार्गावर दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे हा नवा मार्ग हा अपघाती मार्ग ठरतोय का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.







