ट्रक दरीत कोसळून भीषण अपघात

जखमी चालकाला वाचविण्यात यश, क्लोरिन गॅसगळती थोडक्यात टळली

| पोलादपूर | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गावरील भोगाव येलंगेवाडी ते धामण दिवीदरम्यान दरवर्षी खचणार्‍या रस्त्यापूर्वीच्या वळणावर कशेडी घाट उतरून भरधाव वेगाने येणारा एक ट्रक गुरूवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तब्बल 150 फूट दरीमध्ये कोसळला. या ट्रकमधील जखमी जायबंदी चालकाला पोलीस कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांनी बाहेर काढले आहे. दरम्यान, या ट्रकमधून रोहा एम.आय.डी.सी.पर्यंत वाहून नेले जाणारे क्लोरिन गॅस सिलिंडर शाबूत राहिल्याने संभाव्य गॅसगळती टळली आहे. ट्रकच्या ब्रेकफेलमुळे हा अपघात झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये गुरूवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आंध्र प्रदेश येथील एक ट्रक (ए.पी. 21 टी.वाय. 1449) रोहा औद्योगिक वसाहतीमध्ये क्लोरिन गॅसचे सिलिंडर घेऊन जात असताना तीव्र वळण उतारावर ब्रेक फेल झाल्याने ट्रक थेट दरीमध्ये सुमारे दीडशे फूट खोल कोसळला. यावेळी ट्रकचे टायर्स हे ट्रकच्या मालवाहू हौद्यापासून वेगळे झाले. या अपघात ट्रक चालक लक्ष्मीरेड्डी चिनारेड्डी (50, पदीपाडू, ता. जि. करनूल) हा गंभीररित्या जखमी झाला आहे. या ट्रकच्या निसटलेल्या हौद्यातील क्लोरिन गॅसचे सिलिंडर दरीमध्ये इतस्तत: विखुरले गेले. मात्र, सुदैवाने एकाही सिलिंडरचा स्फोट झाला नाही अथवा क्लोरिन वायुगळती झाली नसल्याने शुक्रवारी सकाळी बचाव व पंचनामा कार्य निर्विघ्नपणे पार पडले.

पोलीस उपनिरीक्षक भोसले हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. ट्रकचालक लक्ष्मीरेड्डी चिनारेड्डी यास प्रथम पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करण्यात येऊन पुढील उपचारासाठी जे.जे. हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले. अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Exit mobile version