स्पिडी कंपनी जवळ अग्नीचे तांडव; दहा कटिंगी खाक

। उरण। वार्ताहर ।
जेएनपीए बंदराच्या अखत्यारीत असलेल्या स्पिडी या कंपनी जवळील कटिंग ला रविवारी ( दि१ ) रात्रीच्या सुमारास आग लागण्याची दुदैवी घटना घडली. सदर आगीवर नियंत्रण आणण्यास जेएनपीए बंदरातील अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. ही आग कशामुळे लागली याचे कारण समजले नाही, मात्र या आगीत प्रकल्पग्रस्तांचे उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या दहा कटिंगी भक्ष्यस्थानी पडल्याचे भयानक चित्र समोर येत आहे.

२०२३ या नवीन वर्षाच्या पहिल्याच रात्री जेएनपीए बंदराच्या अखत्यारीत येत असलेल्या स्पिडी या मालाची हाताळणी करणाऱ्या कंटेनर यार्ड ( कंपनी ) जवळील कटिंग ला रविवारी (दि१) रात्रीच्या सुमारास आग लागण्याची दुदैवी घटना घडली आहे.या आगीची तीव्रता एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की कटिंग मधिल सिलिंडरचा मोठा स्फोट झाला.यावेळी निद्रिस्त अवस्थेत असलेले व्यावसायीक, नागरीक, कामगार सैरभैर पळत सुटले.सदर आगीची माहिती स्पिडी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी पोलीस यंत्रणा व जेएनपीए बंदरातील अग्निशमन दलाच्या जवानांना दिली.


सदर आगीच्या ज्वाळा आकाशात उंच झेप घेऊ लागल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जेएनपीए बंदरातील तीन बंम गाड्यातील अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण आणण्यास शर्थीचे प्रयत्न केले.सदर आगीत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.मात्र सदर आगीवर नियंत्रण आणण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना दोन तास लागले.या आगीच्या भक्ष्यस्थानी प्रकल्पग्रस्तांच्या दहा कटिंगी पडल्या असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. न्हावा शेवा पोलीस ठाण्याकडून सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.मात्र सदर आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

जेएनपीए बंदर प्रशासनाने जेएनपीए प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वाहासाठी हाकर्स झोन ( कटींगी ) दिल्या आहेत.मात्र त्या कटींगी मध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत.तरी आम्हा कुटुंबावर आज जे संकट ओढावले आहे.त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी जेएनपीए बंदर प्रशासनाने जेएनपीए प्रकल्पग्रस्तांना आर्थिक सहकार्य करावे अशी मागणी लिलाबाई अनंत म्हात्रे,मंजुळा महादेव तांडेल,शंणू अनंता कडू या जेएनपीए प्रकल्प बाधित महिलांनी केली आहे.

Exit mobile version