‘जेली फिश’ची समुद्रात दहशत

मच्छिमार बोटी लागल्या किनारी
कोळी बांधवांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न ऐरणीवर

| उरण | वार्ताहर |

वातावरणातील बदलामुळे, समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे मासे मिळणे अवघड झाले आहे. त्यातच समुद्रात विषारी जेली फिश माशांची संख्या बळावली असल्याने समुद्रकिनारी बोटी नांगरुन ठेवण्यात आल्या आहेत. आधीच मत्स्यदुष्काळ असताना, बोटी किनारी नांगरण्याची वेळ मच्छिमारांवर आल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍नदेखील ऐरणीवर आला आहे.

याबाबत करंजा गावातील महेंद्र नाखवा, कुंदन नाखवा, जयवंत कोळी यांनी माहिती देताना सांगितले की, दिवसेंदिवस समुद्रात प्रदूषण वाढत आहे. अशा वाढत्या प्रदूषणामुळे आणि वातावरणातील बदलामुळे मासे मिळणे अवघड झाले आहे. तरी ही मच्छिमार बांधव हे आपला जीव धोक्यात घालून मासेमारीसाठी जात आहेत. परंतु, सध्या जेली फिश मासे समुद्र किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. साधारणपणे 100 ग्रॅम ते 50 किलो इतके या जेली फिशचे वजन असल्याचे मच्छीमार सांगतात. या माशाला जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.

यात अनेकदा जाळे फाटत असून, आमचे आर्थिक नुकसान होत असल्याचे मच्छिमारांनी सांगितले. हे मासे जाळ्यात अडकल्यावर मासेमारी करणार्‍या खलाशांना डंक मारत आहेत. अंगावर खाज सुटते, लाल रंगाचे चट्टे उठून गाठी, जखमा निर्माण होतात. त्यात वैद्यकीय उपचार योग्य वेळी न मिळाल्यास खलाशी, कोळी बांधव दगावण्याचा संभव असतो. या भीतीमुळे मच्छिमार बांधवांनी बोटी किनारी नांगरुन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. समस्यांच्या जाळ्यात अडकलेल्या या मच्छिमारांचे वास्तव बंदरात उभ्या या असलेल्या बोटीतून समोर येते.

इथल्या मच्छिमारांना जेली फीशच्या भीतीने ग्रासले आहे. त्याने डंख केला तर दवाखान्यात जाण्याशिवाय पर्याय नाही. त्याच्या भीतीने खलाशी बोटीवर जायला तयार नाहीत. त्यामुळे बोटी किनारी नांगरण्याशिवाय पर्याय नाही.

कुंदन नाखवा, मच्छिमार
Exit mobile version