। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आफ्रिकी देशातील काँगोमधील विस्थापित लोकांवर दहशतवादी हल्ला झाला आहे. यामध्ये कमीतकमी 60 लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामध्ये लोकांची धारदार शस्त्राने हत्या केली गेली आहे.
याबाबतची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. एका स्थानिक एनजीओच्या प्रमुखाच्या हवाल्याने ही बातमी देण्यात आली आहे. ही घटना इटुरी प्रांतात घडली आहे. देशाच्या पूर्व भागात हा प्रांत आहे. या ठिकाणी मे 2021 पासून सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा भाग खनिज संपन्न आहे तसेच त्या ठिकाणी सशस्त्र समूह खुलेआम शस्त्रे घेऊन फिरताना दिसतात. यांच्याशी दोन हात करण्यासाठीच त्या ठिकाणी अनेक प्रकारचे निर्बंध लादले गेले आहेत. या ठिकाणी हिंसक बाबींवर लक्ष ठेवणार्या किवू सिक्टोरिटी ट्रॅकरने ट्विटरवर सांगितलं की, काल रात्रीपासून जुगु भागात प्लेन सावोमध्ये कमीतकमी 40 नागरिकांची धारदार शस्त्राने हत्या केली आहे. आतापर्यंत कुणीही या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही. मात्र, केएसटीचे म्हणणे आहे की या हल्लामागे स्थानिक दहशतवादी गटांचा हात असण्याची शक्यता आहे.