लोकसभेसाठी ‘प्रहार’ची चाचपणी

कडूंचा पदाधिकार्‍यांसोबत संवाद

| छत्रपती संभाजीनगर | वृत्तसंस्था |

अमरावती लोकसभा निवडणूक रिंगणात उमेदवार देणार्‍या प्रहार जनशक्ती पक्षाने आता अन्य मतदारसंघातही चाचपणी सुरू केली आहे. याच पार्श्‍वभूमीवर पक्षनेते आमदार बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातील पदाधिकार्‍यांची बैठक घेत मत जाणून घेतले. यात जालन्यातील भाजपचे उमेदवार विरोधात प्रहारच्या पदाधिकार्‍यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. दरम्यान, ही प्राथमिक बैठक असून कार्यकर्त्यांचा मेळावा घेत निर्णय नंतर जाहीर करू; तसेच जालना येथील खासदारांच्या संदर्भात कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या मत तपासून घेऊ, पाहणी करू असे आ. कडू यांनी सांगितले.

चिकलठाणा विमानतळासमोरील एका सभागृहात शनिवारी आयोजित या बैठकीस छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव यासह अन्य जिल्ह्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पदाधिकार्‍यांनी आपआपल्या मतदारसंघाची मुद्दे, अडचणी आदी मांडल्या. त्यात जालना येथील खासदार विकासकामात अडचणी आणतात. प्रहारकडे असलेल्या ग्रामपंचायतीला निधी दिला जात नाही, असा आरोप एका पदाधिकार्‍यांनी करत निवडणुकीत वेगळा विचार करावा, असे मत मांडले. पदाधिकार्‍यांनी आपआपले विचार प्रगट केल्यावर पक्षनेते कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ही प्राथमिक बैठक आहे. भावना जाणून घेतल्या असून, कार्यकर्ता मेळावा घेत पुढील निर्णय घेतला जाईल. जालनाच्या संदर्भात कार्यकर्त्यांनी केलेल्या भाष्यबाबत माहिती घेतली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

Exit mobile version