नाशिकमध्ये नव्या चेहऱ्याची चाचपणी

| नाशिक | वृत्तसंस्था |

नाशिक लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार जाहीर होत नसल्याने महायुतीतील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात अस्वस्थता वाढत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचे प्रचारदौरे धडाक्यात सुरू झाले आहेत. त्यात महायुतीचा उमेदवार निश्चित होत नसल्याने अस्थैर्याचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे गेल्या काही दिवसांपासून बोलले जात आहे.

विद्यमान खा. हेमंत गोडसे यांच्या नावावर भाजपच्या विरोधामुळे आधीच पूर्णविराम दिला गेलेला आहे. त्यानंतर ओबीसी समाजाचे नेते आणि राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांचे नाव समोर आले. दिल्लीतून भुजबळांना निरोप मिळाल्याने त्यांनीही तयारी सुरू केली.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या फेऱ्या सुरू असूनही भुजबळ यांच्या नावाची घोषणा झाली नाही. नाशिक लोकसभेत मतांचे जातीय धुव्रीकरण झाल्यास भुजबळ निवडून येऊ शकतात का, ही चाचपणी गेले काही दिवस सुरू होती. या संदर्भात समाधानकारक स्थिती नसल्याने भुजबळांऐवजी नव्या चेहऱ्याचा शोध महायुतीतील नेत्यांनी सुरू केलेला आहे. महायुतीचा उमेदवार तिन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सामावून घेणारा असला पाहिजे, या दृष्टीने चाचपणी केली जात आहे. या चाचपणीत भाजप आणि संघ परिवाराने पुढाकार घेतला आहे.

Exit mobile version