अनंत गीतेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे मैदानात
| रायगड | खास प्रतिनिधी |
लोकसभा निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावणार आहेत. इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी अखेरच्या टप्प्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अलिबागमध्ये येणार आहेत. महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विरोधात ठाकरे काय बोलणार याकडेच सर्व मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
गेल्या 15 दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. हाय होल्टेज प्रचारामुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. इंडिया आघाडीच्या प्रचारसभा, प्रचार रॅली, कॉनर्रसभांना मतदारांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. राज्यभरात इंडिया आघाडीच्या रेकार्डब्रेक सभा झाल्या आहेत. रायगड मतदारसंघात फायरब्रॅण्ड नेत्यांनी विरोधकांच्या वक्त्यांना सळो की पळो करुन सोडले आहे. विकासाचे कोणतेच मुद्दे नसल्याने ते फक्त उमेदवार अनंत गीते, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करण्यातच त्यांचा वेळ वाया गेला आहे. त्यामुळे मतदारांमध्ये भाजपासह सुनील तटकरेंविरोधात चांगलाच असंतोष खदखदत आहे.
अलिबाग येथील समुद्रकिनारी असणाऱ्या जेएसएमच्या मैदानावर दुपारी दोन वाजता जाहीर सभा पार पडणार आहे. सभेची तयारी पूर्ण झाली आहे. गीतेंच्या प्रचारासाठी दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे मैदानात उतरत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे यांच्याबाबत ते काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे. इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी जनतेसाठीचा जाहीरनामा आधीच प्रकाशित केला आहे. देशातील, महाराष्ट्रातील जनतेच्या विकासाचे मॉडेल त्यांनी समोर ठेवले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष, चिन्ह सर्व काही चोरुन नेले आहे. तीच अवस्था अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांची केली आहे. या कारणांनी जनतेच्या मनामध्ये ठाकरे आणि पवार यांच्या प्रचारसभांना मतदारांचा चांगलाच प्रतिसाद लाभत आहे. रविवारची सभा प्रचाराची अंतिम सभा असणार आहे.
यावेळी इंडिया आघाडीचे उमेदवार तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, माजी आ. पंडित पाटील, आ. संजय पोतनीस, काँग्रेसचे प्रदेश सचिव ॲड. प्रविण ठाकूर, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक आदींसह शेकाप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इंडिया आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.