राहूल शेवाळेंविरोधात ठाकरे गट आक्रमक

तक्रारदार महिला दाऊद गँगची – शेवाळे

| मुंबई | प्रतिनिधी |

शिंदे गटाचे नेते तथा खासदार राहुल शेवाळे यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या दाव्यानंतर ठाकरे गटातील नेते शेवाळे यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. तसेच शेवाळेंच्या या दाव्यानंतर त्यांच्याविरोधात एका महिलेने अत्याचाराची केलेली तक्रार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शेवाळे यांच्याविरोधात तक्रार करणार्‍या महिलेला मुंबईत यायचे असून तिला संरक्षण द्यावे, अशी मागणी ठाकरे गटातील नेत्या मनिषा कायंदे यांनी केली आहे. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर राहुल शेवाळे यांनी रविवारी (25 डिसेंबर) पत्रकार परिषद घेत तक्रार करणार्‍या महिलेचा दाऊग गँग आणि पाकिस्तानशी संबंध असल्याचा दावा केला आहे.

तक्रारदार महिलेचा एक पाकिस्तानी ग्रुप आहे. या महिलेच्या गँगमध्ये एक फराह नावाची पाकिस्तानी महिला आहे. तसेच राशीद म्हणून एक पाकिस्तानी एजंटही आहे. तक्रारदार महिला दाऊद गँगसोबत काम करते. तिचा दाऊद गँगशी संबंध आहे. जावेद छोटानी, रईस हे दाऊदसोबत काम करतात. या दोघांशी तक्रारदार महिलेचे संबंध आहेत. त्यामुळे हे प्रकरण छोटे नाही. हा संपूर्ण आतंरराष्ट्रीय कट आहे, असा दावा राहुल शेवाळे यांनी केला.

माझ्याविरोधात तक्रार करणारी महिली ही फराहबरोबर दोन वेळा पाकिस्तानला जाऊन आलेली आहे. या महिलेचे दाऊद आणि पाकिस्तानशी कनेक्शन आहे. दाऊद गँगशी संबंध असलेल्या महिलेला युवासेनाप्रमुख पाठीशी घालत आहेत. मला आयुष्यातून उठवण्याचे काम युवासेनाप्रमुखांनी केलेले आहे. राष्ट्रवादी पक्षदेखील याच्या पाठीशी आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नेते नवाब मलिक यांचा दाऊदशी संबंध असल्यामुळे आज तुरुंगात आहेत. या महिलेचा अन्सारी नावाचा वकील आहे. या वकिलासोबत एक एजन्ट बोलत असताना नवाब मलिक यांचा उल्लेख करत आहे. माझ्याकडे भरपूर पुरावे आहेत, असा दावा राहुल शेवाळे यांनी केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयएमार्फत करावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

Exit mobile version