एसटी दरवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक

राज्यभरात चक्काजाम आंदोलन

। मुंबई । प्रतिनिधी ।

एसटी महामंडळाने नुकतीच एसटी तिकीटात दरवाढीची घोषणा केली आहे. एसटी दरवाढीमुळे प्रवाशांसोबत विरोधकही संतप्त झाले आहेत. एसटी महामंडळ फायद्यात आल्याचा दावा करताना भाडेवाढ कसली करता, असा सवाल शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने केला आहे. मंगळवारी (दि.28) राज्यभरातील विविध जिल्ह्यात ठाकरे गटाने चक्काजमा आंदोलनाचा पुकारा केला होता. राज्यातील विविध एसटी डेपो बाहेर ठाकरे गटाचे नेते आक्रमक झालेले दिसून आले. यावेळी, त्यांनी ही भाडेवाढ त्वरीत मागे घेण्याची मागणी केली आहे.

एसटी दर वाढ विरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या पदाधिकार्‍यांकडून बीडसह अमरावती, सोलापूर, ठाणे, कल्याण, कोल्हापूर, बुलडाणा, धुळे बस स्थानक परिसरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. महायुती सरकारने एसटी भाड्यामध्ये 15 टक्क्यांनी वाढ केली. या विरोधात ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यभरात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने महायुती सरकार विरोधात आंदोलन केली आहेत. यावेळी ठाकरे गटाने जोरदार घोषणाबाजी करत एसटी भाडेवाडीचा विरोध केला. तसेच, जोपर्यंत भाडेवाढ कमी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील आणि यापेक्षाही उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

सरकार एकीकडे लाडके बहीण योजना राबवून लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देत आहे, तर दुसरीकडे महागाई वाढवून, एसटी भाडेवाढ करत त्यांच्याकडून दाम दुपटीने पैसे वसूल करते.


– धनंजय बोडारे,
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष

Exit mobile version