| मुंबई | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे विद्यामान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधातील ठाकरे गटाचा उमेदवार निश्चित झाला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली असून, याबाबत स्वतः अयोध्या पोळ यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
याबाबत आपल्या ट्वीटमध्ये अयोध्या पोळ यांनी म्हटले आहे की, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आशिर्वादाने मशाल चिन्हावर शिवसेनेकडून कल्याण लोकसभा लढवत आहे. ज्यांच्याकडे ईडी, आयटीसारखी ताकद आहे, असा स्वयंघोषित जागतिक स्तराचा सर्वात मोठा पक्षासोबत युतीत आहे, अशा मुख्यमंत्र्याच्या खासदार मुलाच्या विरोधात संधी दिल्याबद्दल आदरणीय साहेब, आदित्यजी ठाकरे, संजयजी राऊत साहेब, वरुणजी सरदेसाई, साईनाथजी दुर्गे यांचे खुप खुप धन्यवाद.
ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून कल्याणमधून आपल्याला उमेदवारी मिळाली असल्याची स्वतःच घोषणा केली आहे. मात्र, ठाकरे गट किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडून याबाबत कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
कोणाची ताकद जास्त? कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला समाजाला जातो. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं राजकीय वर्चस्व पाहायला मिळते. या मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. ज्यात भाजपकडे तीन मतदारसंघ असून, शिवसेनेकडे एक मतदारसंघ आहे. तसेच एक मनसे आणि एक राष्ट्रवादीचा आमदार या मतदारसंघात आहे. विशेष म्हणजे शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक होत असल्याने या मतदारसंघात शिंदेंच्या सेनेची ताकद जास्त आहे की, ठाकरेंच्या सेनेची हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.