ठाकरे गटाची सरकारवर टीका
। मुंबई । प्रतिनिधी ।
मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले आणि आता मंत्र्यांचे बंगले वाटपही पार पडले आहे. परंतु, परभणीत सोमनाथ सूर्यवंशी आणि बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचे नक्की काय झाले? या प्रश्नाचे उत्तर फडणवीस सरकार देऊ शकलेले नाही. सूर्यवंशी आणि देशमुख यांचे खून झाले तसेच हे दोन्ही खून सरकार पुरस्कृत आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी ‘एसआयटी’ चौकशीचा जो खेळ मांडला आहे, ती धूळफेक आहे, अशा घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे.
संतोष देशमुख या सरपंचाची बीडच्या रस्त्यावर निर्घृणपणे हत्या झाली. या खून प्रकरणातले खरे आरोपी तसेच सूत्रधार हे सरकारमध्ये सन्मानाने विराजमान आहेत. मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अवतीभवती, मंत्रिमंडळात ते वावरत आहेत, असा थेट आरोप ठाकरे गटाने केला आहे. परभणी तसेच बीडच्या हत्या या जातीय द्वेषातूनच झाल्या आणि त्यास महाराष्ट्रातील भाजपा सरकार जबाबदार आहे. सूर्यवंशी हे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते होते आणि स्वतः संतोष देशमुख हे भाजपाचे कार्यकर्ते असतानाही त्यांचा खून झाला. नमिता मुंदडा यांच्या निवडणुकीत सरपंच देशमुख हे त्यांच्या गावातील भाजपाच्या बुथवर उपस्थित होते. अशा कार्यकर्त्याची हत्या का व्हावी आणि या हत्येमागे सतत एकच नाव का घेतले जाते? असा प्रश्न शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने उपस्थित केला आहे.
तसेच, संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजित पवार यांचे उजवे हात असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या ‘खास’ वाल्मीक कराडचे नाव घेतले जाते. हे सत्य असेल तर कराड यांना वाचविण्यासाठी धनंजय मुंडे हे नक्कीच प्रयत्न करीत आहेत. कराड यांचा निकाल लागेपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवले असते तर फडणवीस यांची नैतिकता आणि निष्पक्षता उजळून निघाली असती, परंतु, मुख्यमंत्री फडणवीस यांनी तसे केले नाही. वाल्मीक कराड यांचा प्रभाव इतका की, देशमुख खून प्रकरणात त्यांना अद्याप पोलिसांनी साधे चौकशीलाही बोलावलेले नाही, याकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे.