| मुंबई | प्रतिनिधी |
मी महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी मला विमानातून उतरवलं होतं. आता नियतीने त्यांना खाली उतरवलं आहे. अशी खोचक टीका माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केली.
वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तर त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत एक वक्तव्य केलं जे चांगलंच चर्चेत आहे. ठाकरे सरकारच्या काळात राज्यपाल असणार्या भगतसिंह कोश्यारींना विमानातून उतरवण्यात आलं होतं. या गोष्टीची आठवण करून देत आपल्या खास शैलीत भगत सिंह कोश्यारी यांनी माजी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे संत माणूस आहेत. ते कुठे राजकारणात आले? त्यांनी त्यांची संघटना व्यवस्थितपणे चालवायला हवी होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसण्याच्या लायकीची व्यक्ती नव्हती तरीही त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. शरद पवारांसारखा मार्गदर्शकही उद्धव ठाकरेंना वाचवू शकला नाही, असेही कोश्यारी म्हणाले.
बारा आमदारांचा निर्णय
12 आमदारांबाबत निर्णय घेतला नाही? असं भगतसिंह कोश्यारींना विचारण्यात आलं. त्यावर कोश्यारींनी सांगितलं की, महाविकास आघाडीची शिष्टमंडळ येत राहिली. मी त्यांना सांगितलं, हे पाच पानांचं पत्र पहा. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. पाच पानांच्या पत्रात तुम्ही राज्यपालांना धमकी देत, कायदे सांगत आहात. शेवटी लिहतात 15 दिवसांत मंजूर करा.
कुठं लिहिलं की मुख्यमंत्री राज्यपालांना सांगतात, एवढ्या दिवसांत मंजूर करा. संविधान, विधानसभेत असं कुठं लिहलं आहे. कधीतरी ते पत्र समोर आल्यानंतर सत्य सर्वांसमोर येईल. पण, दुसर्याच दिवशी मी सही करणार होतो, असं भगतसिंह कोश्यारींनी स्पष्ट केलं आहे. माझे संबंध चांगले होते. मात्र, त्यांचे (उद्धव ठाकरे) सल्लागार कोण होतं? त्यांचे येऊन सांगत होतो की, आम्हाला वाचवा. उद्धव ठाकरे शकुनीमामाच्या जाळ्यात फसले होते. माहिती नाही कोण होता, तो शकुनीमामा, अशी टीप्पणी कोश्यारींनी केली आहे.






