| रत्नागिरी | प्रतिनिधी |
लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात विनायक राऊत यांचा प्रचार करण्यासाठी उद्धव ठाकरे आले होते. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. ‘कोकण हे शिवसेनेचे वैभव आहे, एक तर शिवसेना फोडली, शिवसेना चोरली, चिन्ह चोरलं. चोरलं तर चोरलं आणि कोकणातून धन्युष्यबाण गायब केला. दिल्लीतले दोन गद्दार शिवसेनेबरोबरचं कोकणचं नातं तोडायला निघाले’, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
मोदींना अजून सूर मिळत नाहीये. आयपीएल मॅच सुरू झाल्यात, कोणता प्लेअर कुठे गेला हे त्यांना अजून समजत नाही. 2019 साली मोदींचा रुबाब होता, कारण शिवसेना त्यांच्यासोबत होती. शिवसेना सोबत होती तेव्हा मोदी आणि शाह यांना किती वेळा महाराष्ट्रात यावं लागलं? तुम्हाला अवदसा का आठवली माहिती नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘हे मंत्री लघु सूक्ष्म, एक तरी सूक्ष्म प्रकल्प रत्नागिरीला आणला का? विनायक राऊत, वैभव नाईक उभे राहिले नसते तर कोकणात गुंडाराज झाला असता. इथे जोर जबरदस्तीने कारभार उभारले जात आहेत. त्यांचं मत असं आहे, त्यांचं सरकार आल्यानंतर बारसू काय कोणत्याही प्रकल्पावरून कोणालाही मारू. भाजपला माझा प्रश्न आहे, विनाशाचा प्रचार का करताय? त्यांचं मत म्हणजे विनाशाला मत. महाराष्ट्रावर यांचा आकस टोकावर पोहोचला आहे,’ असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं.
उद्या ईडी सीबीआय आमच्या ताब्यात असणार आहे. आमचं सरकार तुमच्या नांग्या ठेचल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेब ठाकरे तुमच्या पाठीशी उभे राहिले नसते, तर अटलजींनी तुम्हाला टाकलं असतं. 400 पार चा नारा शांत झाला, त्यांचं काही चालत नाही. 2014 साली म्हणाले होते प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देणार होते, आले का? सुप्रीम कोर्टाला धन्यवाद देतो, तुम्ही योग्यवेळी यांची हंडी फोडली’, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
जिथे जातात तिथे राम राम करतात, एक गाणं आहे, आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा, तसं आता राम राम करत आहेत. ही थापाड्यांची टोळी नाही, तर ही दरोडेखोरांची फौज आहे. मी यांच्यासारखं वेडंवाकडं बोलत नाही, जे मी बोलते ते करून दाखवतो. यांची गॅरंटी म्हणजे एक अकेला सबसे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी, ज्याचा सर्वात मोठा घोटाळा त्याला मोठं मंत्रिपद, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.