निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरेंचा विरोध; ठोठावले हायकोर्टाचे दार

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

अंधेरीमधील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातील वाद शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणत्याही गटाला वापरता येणार नाही असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाने आता हायकोर्टाचे दार ठोठावले आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह याबाबत घेतलेल्या निर्णयाला ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं. दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेवर उद्या सुनावणी होणार असल्याचं कळतंय. शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय स्थगित करावा, या प्रमुख मागणीसाठी ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केलीय.

शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी याबाबत सविस्तर भूमिकाही मांडली होती. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घाईघाईने घेतला असल्याचं त्यांनी म्हटलंय.

उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल या तीन चिन्हाची पसंती दिली आहे. त्यानुसार या तीन चिन्हापैकी कुठलं चिन्ह निवडणूक आयोग उद्धव ठाकरेंच्या पक्षाला देणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. अशातच ठाकरे गट आयोगाविरोधात हायकोर्टात गेल्याने या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.

Exit mobile version