। पुणे । वार्ताहार |
राज्य अश्वारोहण संघटना आणि नंदुरबार जिल्हा संघटनेच्या वतीने नंदुरबारमधील सारंगखेडा यात्रेतील चेतक फेस्टिव्हलमध्ये झालेल्या राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत पुण्याच्या ऐश्वर्या थैलने तीन सुवर्णपदकांची कमाई केली. ऐश्वर्या थैलने बारा ते चौदा वर्षे मुलींच्या गटात सहभागी होताना ड्रेसेज, हॅक्स, शो जपिंग नॉर्मल या प्रकारात अव्वल क्रमांक पटकावला. याचबरोबर तिने पोल बेंडिंगमध्ये ब्राँझपदकाचीही कमाई केली. ऐश्वर्या थैल सेंट मेरीज स्कूलमध्ये आठवी इयत्तेत शिकते. ती पुण्यातील दिग्विजय हॉर्स रायडिंग क्लबमध्ये सराव करत आहे.
ऐश्वर्या थैलने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच सरावाला सुरवात केली. त्यामुळे तिच्यासाठी ही स्पर्धा म्हणजे मोठे आव्हान होते. मात्र, मार्गदर्शक गुणेश पुरंदरे, प्रशिक्षक स्वप्नील साने, अनिकेत वाघोडे यांच्या साथीने तिने हे आव्हान यशस्वीपणे पार पाडले. तिने चारही प्रकारांत आपले कौशल्य दाखवून उपस्थितांची आणि पंचांची मने जिंकली. हा प्रवास म्हणजे ऐश्वर्या थैलसाठी मोठे आव्हान होते. या यशात तिच्या मेहनतीचा मोठा वाटा आहे. मात्र, लहान वयात अश्वारोहणातील तिचे कौशल्य पाहून गुणेश पुरंदरे आणि स्वप्नील साने यांनी तिला प्रोत्साहन दिले. त्यामुळे ऐश्वर्या थैलचे आणि तिच्या टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.