चीनच्या जोडीवर मात; भारतीय जोडी यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा अजिंक्य
| बँकॉक | वृत्तसंस्था |
भारताच्या सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या तारांकित जोडीने चीनच्या चेन बो यांग आणि लियू यी जोडीला नमवत थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील (सुपर 500 दर्जा) पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावले. यासह पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी आपण योग्य मार्गावर असल्याचेही त्यांनी दाखवून दिले.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असणाऱ्या सात्त्विक-चिराग जोडीने 29 व्या मानांकित चीनच्या जोडीला 21-15, 21-15 असे सरळ गेममध्ये पराभूत केले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय जोडीचे हे हंगामातील दुसरे आणि ‘बीडब्ल्यूएफ’ जागतिक टूर स्पर्धेत कारकीर्दीतील नववे जेतेपद ठरले. त्यांनी मार्चमध्ये फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे (सुपर 750 दर्जा) वीजेतेपद मिळवले. तसेच या जोडीने यंदा मलेशिया खुल्या (सुपर 1000 दर्जा) आणि इंडिया खुल्या (सुपर 750 दर्जा) बॅडमिंटन स्पर्धेतही अंतिम फेरीचा टप्पा गाठला होता.
सात्त्विक-चिराग जोडीला ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्याच फेरीत पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर सात्त्विकला झालेल्या दुखापतीमुळे ही जोडी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत खेळू शकली नाही. थॉमस चषकातही या जोडीला चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र, थायलंड खुल्या स्पर्धेत सात्त्विक आणि चिरागने आपला सर्वोत्तम खेळ करताना एकही गेम न गमावता जेतेपदावर मोहोर उमटवली. चीनच्या चेन-लियू जोडीने सात्त्विक-चिरागला झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश मिळाले नाही.
अंतिम सामन्यात सात्त्विक-चिराग जोडीने दमदार सुरुवात करताना पहिल्या गेममध्ये 5-1 अशी आघाडी मिळवली. यानंतर चेन आणि लियू यांनी पुनरागमन केले. त्यांनी 10-7 अशी आघाडीही मिळवली. मात्र, सात्त्विक-चिरागने सलग तीन गुण कमावताना गेम 10-10 असा बरोबरीत आणला. गेमच्या मध्यंतरानंतर सात्त्विक-चिराग जोडीने आधी 14-11 अशी आघाडी घेतली, मग ती 16-12 अशी वाढवली. चीनच्या जोडीने तीन गुणांची कमाई केली, पण त्यानंतर भारतीय जोडीने सलग पाच गुण मिळवत गेम जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने आक्रमक सुरुवात केली. त्यांनी 8-3 अशी आघाडी घेतली आणि मध्यंतराला 11-6 अशी आघाडी राखली. चेन आणि लियू जोडीने सलग तीन गुण मिळवत पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, सात्त्विकने त्यांची लय मोडली. भारतीय जोडीकडे 15-11 अशी आघाडी असताना सर्व्हिस करण्यास विलंब लावल्याबद्दल सात्त्विकला चेतावणी देण्यात आली. त्यानंतर चिरागकडून चुका झाल्याने चीनच्या जोडीला गुण मिळाले. त्यामुळे भारतीय जोडीची आघाडी 15-14 अशी कमी झाली. मात्र, यानंतर भारतीय जोडीने आपला खेळ उंचावत गुणांचा सपाटा लावला आणि जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
आता सर्वाचेच लक्ष पॅरिस ऑलिम्पिककडे आहे. सर्वच खेळाडूंना या स्पर्धेत पदक जिंकायचे आहे. आम्हालाही चांगली कामगिरी करण्याचा विश्वास आहे. दुहेरीत चीन किंवा इंडोनेशियाच्या खेळाडूंना हरवणे हे अशक्यप्राय आव्हान मानले जायचे. मात्र, आम्ही हे वारंवार करून दाखवले आहे.
चिराग शेट्टी