ठाणं सुटलं, रायगड अटकलं

अवजड वाहनांना ठाण्यात बंदी, जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

| रायगड | खास प्रतिनिधी |

ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील अवजड वाहनांना ठाणे जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पहाटे चार ते सकाळी दहा आणि दुपारी दोन ते रात्री नऊ या कालावधीत वाहतुकीला मज्जाव करण्यात आला आहे. सदरची अधिसूचना 16 ते 30 ऑगस्ट या कालावधीसाठी अंमलात येणार असून, तशी अधिसूचना रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. रायगड जिल्ह्याच्या तोंडावर अवजड वाहनांच्या रांगा लागल्यास नवल वाटायला नको. त्यामुळे ठाणे जिल्ह्याची वाहतूक कोंडी सोडवताना रायगड जिल्ह्यात ती होणार नाही ना, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. सदरची वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही जीवनावश्यक वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने, रुग्णवाहिका, प्रवासी वाहतूक करणार्‍या सर्व प्रकारच्या बसेस व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना लागू राहणार नाही, असेही त्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल-तळोजा, अलिबाग, रोहा, माणगाव, महाड या ठिकाणी एमआयडीसी आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग ते थेट गोवा राज्यातून अवजड वाहनांची वाहतूक मुंबई आणि ठाणे या महानगरांमध्ये होत असते. या कालावाधीत मोठ्या प्रमाणात जड, अवजड वाहने प्रवास करतात. त्यामुळे एवढा मोठ्या संख्येने येणारी वाहने कोठे थांबवायची, हा खरा प्रश्‍न आहे. वाहने थांबवली तर, रायगड जिल्ह्याच्या महत्त्वाच्या महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जिल्हाधिकारी यांनी असे आदेश जारी केले आहेत. ते अद्याप जिल्ह्यातील महत्त्वाच्या विभागातील अधिकार्‍यांपर्यंत पोहोचलेले नाहीत. काही अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, आमच्या वरिष्ठ कार्यालयाला याबाबत माहिती आहे. मात्र, त्यांच्याकडून आम्हाला अद्याप सूचना मिळाल्या नसल्याचे सांगण्यात आले.

जिल्हाधिकारी रायगड यांनी आदेश देऊन तीन दिवस झाले आहेत. तसेच 16 ऑगस्टपासून अंमलबजावणी करण्याच्या सूचना आदेशात आहेत. मात्र, त्याबाबत काही हालचाल होत नसल्याचे चित्र आहे. रायगड जिल्ह्यातून येणारी जड, अवजड वाहने ठाणे शहरात येणार नाहीत, अशा वेळा निश्‍चित करुन जड-अवजड वाहनांना प्रवेश मनाई केल्यास ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास व वाहतूक समस्या बर्‍याच प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असल्याचा सरकारचा दावा आहे. रायगड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातून ठाणे जिल्ह्यात वाहतूक करणार्‍या जड-अवजड वाहनांना ठाणे जिल्ह्यात प्रवेशासाठी मनाई करण्याच्या दृष्टीकोनातून व रायगड जिल्ह्यातील स्थानिक वाहतूक परिस्थिती विचारात घेऊन ठाणेलगतच्या कार्यक्षेत्रात वाहतूक नियंत्रण अधिसूचना निर्गमित केल्यास दोन्ही जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना दिलासा देणे शक्य होईल. त्याअनुषंगाने स्थानिक परिस्थितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश विचारात घेऊन अधिसूचना निर्गमित करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा रस्ता सुरक्षा ठाणे यांनी विनंती केलेली आहे. त्या अनुषंगाने हे आदेश जारी करण्यात आले असल्याचे रायगड जिल्हा प्रशासानाने स्पष्ट केले.

Exit mobile version