ती ठरली काळरात्र.. नातेवाईकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश

| अलिबाग | प्रमोद जाधव |

बुधवारी… रात्रीचा अकराचा सुमार… सर्वत्र दाट काळोख, पावसाचा जोरही वाढला होता. या काळ्याकुट्ट रात्रीत खालापूर तालुक्यातील इर्शाळ आदिवासी ठाकूरवाडीवर जणू डोंगरच कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. अनपेक्षित घडलेल्या घटनेने सारेच भयभीत झाले. डोळ्यादेखतच होत्याचे नव्हते झाले आणि जिवंतपणी सारी आदिवासीवाडी धरणीच्या पोटात गाढली गेली. ती भयानक रात्र त्या छोट्याशा आदिवासीवाडीसाठी काळरात्रच ठरली. त्या दुर्घटनेेने क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि ये माझी आय… माझं लेकरु कुठ हाय… अशा काळीज पिळवटून टाकणाऱ्या आक्रोशाने सारा परिसर दणाणून गेला.


चौकमधील इरसाल येथील आदिवासी, ठाकूरवाडी ही निसर्गाच्या सानिध्यात आहे. उंच डोंगरावर हिरव्यागार हिरवळीच्या कुशीत असलेल्या या वाडीमध्ये 48 घरांची वस्ती आहे. मोलमजुरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणारा आदिवासी, ठाकूर समाज गुण्यागोविंदाने राहत होता. जिल्ह्यामध्ये बुधवारी दि.19 रोजी रेड अलर्टचा इशारा दिल्याने दिवसभर पाऊस सुरु होता. रात्री जेवण झाल्यानंतर प्रत्येकजण आपआपल्या घरात टीव्ही बघून शांतपणे झोपी गेले.


डोळ्यादेखतच वाडी गडप
एका बाजूला जोरदार पाऊस, दुसऱ्या बाजुला इरसाल वाडीमधील काही जण डोंगराच्या पायथ्यालगत असलेल्या वाडीमध्ये नातेवाईकांकडे आले होते. काहीजण मासेमारीसाठी गेले होते. तर, काही आदिवासी ठाकूर समाजातील मंडळी निद्रावस्थेत होती. गाढ झोपेत असताना बुधवारी सुमारे रात्री साडेअकरा ते गुरुवारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास डोंगरावरून दगड माती वेगात खाली येऊन अनेक घरे दरडीखाली गेली. अचानक काळाने घाला घातल्याने संपुर्ण घरांसह घरात झोपी गेलेली मंडळी दरडीखाली दबली गेली. काय होते, काय झाले हे कुणालाच समजले नाही. डोळ्यादेखतच आख्खी वाडीच डोंगरावरील दरडींनी गडप करुन टाकली. जे त्यातून बचावले त्यांनी एकच आरडाओरड करुन जीव वाचविण्यासाठी वाट दिसेल तिकडे पळू लागले.


या घटनेची खबर मिळताच रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास काही पोलीस व एका रुग्णवाहिका आल्याची चाहूल पायथ्याशी असलेल्या वाडीमधील मंडळींना लागली. त्यांनी पोलिसांना विचारणा केल्यावर दरड कोसळल्याचे लक्षात आले. दरड कोसळल्याचे ऐकल्यावर महिलांसह तेथील नातेवाईकांनी टाहो फोडण्यास सुरुवात केली. काहीजणांनी घटनास्थळी जाऊन आपली नातेवाईक सुरक्षीत आहेत की नाही, हे पाहण्याचे काम केले. पण रात्रीची वेळ, त्यात पाऊस त्यामुळे काहीच समजत नव्हते.


वाडीत पोहोचणेच मुश्किल
दरडीखाली सापडलेल्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांसह एनडीआरएफ दल, रिस्क्यू टीम तसेच पोलिसांनीदेखील प्रयत्न केले. पण काहीच सुगावा लागत नव्हता. पुण्याच्या जुन्या महामार्गालगत असलेल्या चौकमधील रेल्वे स्थानकापासून दरड कोसळलेली वाडी सुमारे पाच ते सहा किलो मीटर दूर उंच डोंगरावर होती. मुख्य रस्त्यापासून डोंगराच्या पायथ्यापर्यंत वाहने जात होती. पण पायथ्यापासून दरडबाधीत वाडीत चालत गेल्याशिवाय पर्याय नव्हता. चालत जाण्यासाठी दीड ते दोन तास लागत होते. तरीदेखील स्थानिकांसह पोलीस, एनडीआरएफ, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाने जिवाची बाजी लावत दरडीखाली सापडलेल्यांना काढण्यापासून त्यांना वरून खाली आणेपर्यंतचे काम केले. उंच डोंगराळ भागातून जखमींसह मृतदेहांना आणण्यासाठी कित्येक तास तास लागत लागत होते.


जीवाभावाची माणसं गमावली
दरडीत सापडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांचे डोळे त्यांच्या नातेवाईकांकडे लागून राहिले होते. महिला, वयस्कर सर्वांनीच टाहो फोडला होता. काही जण देवाला हाक मारत होते. काहींचा मुलगा, काहींचा नवरा, काहींचा जावई व मुलगी, तर काहींचे वडील, काहींची आई या दरडीखाली सापडले होते. पायथ्यालगत असलेली वाडी प्रशासकिय यंत्रणेसह आदीवासी, ठाकूर समाजातील नातेवाईकांनी भरली होती. सतत पाऊस पडत असताना त्याकडे दुर्लक्ष करीत दरडीत सापडलेल्यांना साद देऊन टाहो फोडत होते.


दरडीत सापडलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत होते. मात्र उंच डोंगरावर असलेल्या या वाडीमध्ये कोणतेही वाहन जाऊ शकत नव्हते. त्यामुळे दरडीत सापडलेल्यांना काढताना एनडीआरएफ, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाला तारेवरची कसरत करावी लागली. कुदळ, फावड्याने माती बाजूला सारून दरडीत सापडलेल्या काढण्याचा प्रयत्न केला. त्यातून जे सापडत होते त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात होता. दरड कोसळल्याची माहिती मिळताच दरडीत सापडलेल्यांचे नातेवाईक जशी वाट मिळत तशी घटनास्थळी धावत होती. काही जण चालत तर काहीजण पायथ्यापर्यंत अन्य वाहनांचा अधार घेत पोहचली.


पायथ्याशी आरोग्य यंत्रणा तैनात
गडावरील इरसालवाडी येथील घरांवर दरड कोसळल्याची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींवर प्राथमिक उपचार करता यावा यासाठी पायथ्याशी असलेल्या एका समाज मंदिरात आरोग्य यंत्रणा तैनात केली होती. किरकोळ दुखापत झालेल्यावर उपचार करण्याबरोबरच रक्तदाब तपासणीचे काम तेथील यंंत्रणेकडून केले जात होते. जिल्ह्यातून पाच टीम आल्या होत्या. त्यात 15 वैद्यकिय अधिकाऱ्यांचा समावेश होता. तसेच, अधिक उपचारासाठी चौक येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात तसेच अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय व एमजीएम रुग्णालयात खाटांची व्यवस्था करण्यात आली होती.


सुरक्षा यंत्रणानी कसली कंबर
इरसालवाडी येथे झालेल्या दरड दुर्घटनेनंतर रायगड पोलीस दलासह एनडीआरएफ, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, खालापूर, खोपोली, पनवेल, नवी मुंबई येथील अग्नीशमन दलानी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळापासून मुख्य रस्त्यावर नाक्यानाक्यावर पोलीसांचा बंदोबस्त तैनात केला होता. घटनास्थळी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये. तसेच गर्दी होऊ नये यासाठी पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जखमींसह मृतांना नेण्यासाठी रुग्णवाहिकेला अडथळा निर्माण होऊ नये, वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुख्य रस्त्यालगत वाहतूक पोलीस आपली जिवाची बाजी लावून कर्तव्य बजावत होते. वेगवेगळया सुरक्षा यंत्रणेने रात्रीची दिवस करत कंबर कसली.

Exit mobile version