प्रकाश आंबेडकरांचं जनतेला भावनिक आवाहन
| अकोला | प्रतिनिधी |
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आम्ही अंगावर घेऊ शकतो, त्यांना समजावून सांगू शकतो. रस्त्यावरील लढाई आम्ही जिंकू शकतो, पण सभागृहातील लढाई जिंकायची असेल, तर सभागृहात जाणे गरजेचं आहे. तुमच्या मतांनी मी सभागृहात जाऊ शकतो आणि तुमची लढाई मी लढू शकतो, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘प्रेशर कुकर’ या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन अकोल्यातील जनतेला केलं आहे. अकोल्यातील फतेह चौक येथील प्रचार सभेत ते बोलत होते. सभेला हजारोंच्या संखेने नागरिक उपस्थित होते.
आंबेडकर म्हणाले की, जो या देशात जन्माला आला तो भारतीय नागरिक आहे, त्याला कोणता पुरावा देण्याची गरज नाही. आता हे सरकार कागद मागत आहे. याचा अर्थ हा आहे की, तुमच्याकडे कागद आहेत, तर तुम्ही नागरिक आहात. तुमच्याकडे कागद नसेल, तर तुम्ही तुरुंगात जाल. ही लढाई बाहेरून लढली जाऊ शकत नाही, काही लोक म्हणतात की, आम्ही न्यायालयात जाणार. न्यायालय फक्त एवढच सांगू शकते की, हा कायदा संविधानिक आहे किंवा नाही, पण हा कायदा रद्द करायचा असेल, तर संसदच ते करू शकते, त्यासाठी कोणीतरी संसदेत जाऊन आवाज उठवणे गरजेचे आहे.
सरकारकडून निराशा लोक आशा लावून होते की, हे सरकार बदल घडवेल, पण त्यांची निराशा झाली आहे. ते मतदानाला जात नाहीत. याचा अर्थ असा आहे की, जे धर्मनिरपेक्ष नागरिक आहेत त्यांच्यावर जबाबदारी आहे की, त्यांनी 100 टक्के मतदान करावे, तेव्हा बदलाला सुरुवात होईल. आपण जर भाजपला मतदान दिलं, तर आपणच आपल्या पायावर कुर्हाड मारून घेतली असं होईल, असेही त्यांनी म्हटलं आहे.